जम्मू-काश्मीर : माणुसकीला लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील रुग्णालयात एका जोडप्याने आपल्या 2 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह तेथेच सोडला, कारण त्यांच्या मुलाला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. यामुळे मुलावर अंत्यसंस्कार देखील झालेले नाही. रुग्णालयामधून या जोडप्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता आरोग्य अधिकारी या जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या महाराजा गुलाबसिंग रुग्णालयामध्ये  (Maharaja Gulab Singh Hospital) , कोरोनाने संक्रमित 2 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दारा सिंह म्हणाले, "सोमवारी त्या जोडप्यांनी सकाळी 2 महिन्यांच्या मुलाला आमच्याकडे आणले, ज्याला हृदयरोगासह अनेक समस्या आहेत. परंतु उपचारा आधी रात्री साडेआठच्या सुमारास त्या मुलाचा मृत्यू झाला. जेव्हा त्या मुलाची तपासणी केली गेली, तेव्हा त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले."


मुलाचा मृतदेह न घेता हे जोडपे रुग्णालयातून पळून गेले


डॉ. दारा सिंह पुढे म्हणाले, "मुलाच्या मृत्यूनंतर आम्ही त्याच्या पालकांनाही कोरोनाची चाचणी घ्यावी अशी विनंती केली, तेव्हा त्यांनी डॅाक्टरांना विश्वास दिला की ते करुन घेतील, परंतु त्यानंतर ते दोघेही ताबडतोब रुग्णालयातून पळून गेले आणि मुलाचा मृतदेह रुग्णालयातच सोडला. आमच्या सुरक्षा पथकानेही या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप त्यांच्याबद्दल काहीही कळू शकलेले नाही."


रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप मुलाचे अंत्यसंस्कार झालेले नाही. डॉ. दारा सिंह म्हणाले की, मुलाचा मृतदेह रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतल्यानंतर अंत्यसंस्कार कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले जातील.


जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना संक्रमणाची परिस्थिती


देशात कोरोना व्हायरस संसर्गाची रुग्ण संख्या सतत वाढत आहेत. या वर्षाच्या कोरोना साथीच्या काळात देशाला अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी, केंद्रशासित प्रदेशात संक्रमणाची 3 हजार 700 पेक्षा जास्त नवीन रुग्ण संख्या नोंदवली गेली तसेच 51 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह, सक्रिय प्रकरणांची संख्या 34 हजारांवर गेली आहे. त्याचबरोबर, भारतात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 3 लाख 50 हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर सुमारे 3 हडार 500 लोकांचा मृत्यू झाला आहे.