संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; कोणत्या मोठ्या घोषणा होणार?
Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात कोणत्या घोषणा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत संसदेचे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज 9 दिवस चालणार आहे. 31 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेचे कामकाज सुरू होईल.
मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे. तर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळं अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर, महिलांसाठीही काही मोठ्या घोषणा होऊ शकतात.
थिंक टँक पीआरएस लेजिस्लेटिव रिसर्च (PRS Legislative Research) संस्थेने जारी केलेल्या डेटानुसार, मागील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात उत्पादकता 5.3 टक्क्यांनी वाढली होती. तर, पहिल्या टप्प्यात कामकाज 83.8 टक्के झाले होते. तर, उर्वरित सत्रात विरोधक आणि सत्ताधाराच्या गोंधळामुळं कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेने कार्यकाळात जवळपास 34 टक्के आणि राज्यसभेत 24 टक्क्यांपर्यंत काम केले होते. तर, लोकसभेने 133.6 तासांच्या नियोजित वेळेच्या तुलनेत सुमारे 45 तास काम केले, तर राज्यसभेने 130 पैकी 31 तासांपेक्षा जास्त वेळ काम केले.