संसदेतील सर्व खासदारांनी भारतीय लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे- मोदी
आज आपल्या देशाचे वीर जवान सीमारेषेवरील दुर्गम भागात शौर्याने लढत आहेत.
नवी दिल्ली: संसदेतील सर्वपक्षीय खासदारांनी एकमताने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, या अधिवेशनात संसदेवर एक विशेष जबाबदारी आहे. आज आपल्या देशाचे वीर जवान सीमारेषेवरील दुर्गम भागात शौर्याने लढत आहेत. काही दिवसांनी या भागात बर्फवृष्टी सुरु होईल. मात्र, तरीही आपले सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी दुर्गम भागात पाय रोवून उभे आहेत. त्यामुळे संसदेतील सर्व खासदारांनी एकमताने भारतीय जवानांच्या पाठिशी उभा असल्याचा संदेश दिला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
याशिवाय, नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर लस येईपर्यंत कोणतीही ढिलाई बाळगून चालणार नाही, असेही सांगितले. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोरोनाची लस लवकरात लवकर तयार व्हावी, याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. आपले वैज्ञानिक सर्वांना या संकटातून बाहेर काढतील, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून भारत-चीन तणाव, बेरोजगारी, महागाई आणि कोरोना अशा मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. आज संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंडित जसराज, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, राज्यपाल लालजी टंडन, चेतन चौहान आणि माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह या दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर एका तासासाठी लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.