`आजही कमळरुपी चक्रव्यूह! ते शाह आणि मोदी...` राहुल गांधींच्या विधानावरून संसदेत `महाभारत`
Rahul Gandhi Maharbahrat Statement: देशाला चक्रव्युहात अडकवंल जातंय, याचा आकार कमळासारखा आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला.
Rahul Gandhi Maharbahrat Statement: देशाला चक्रव्युहात अडकवंल जातंय, याचा आकार कमळासारखा आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. संसदेतील आपल्या भाषणात त्यांनी अग्नीवर, शैक्षणिक बजेट अशा विविध मुद्द्यांवरुन भाजपवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाभारताचा संदर्भ दिला. चक्रव्युहचं दुसरं नाव पद्मव्युह असे असल्याचे मला संशोधनातू कळाले. पद्मव्युह हे कमळ फुलाच्या आकाराचे असते. ज्याचे चिन्ह पंतप्रधान आपल्या छातीवर घेऊन फिरतात. ज्याप्रमाणे अभिमन्यूला चक्रव्युहात फसवण्यात आलं होतं, ज्याप्रमाणे भारतातील तरुण, शेतकरी, आई-बहिणींना फसवलं जात असल्याची टीका राहुल गांधींनी आपल्या भाषणातून केली.
शिक्षणाच्या बजेटमध्ये गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच खूप कमी निधी दिला गेला. जो की केवळ 2.5 टक्के इतका आहे. शेतकऱ्यांना चक्रव्युहातून बाहेर काढणयासाठी एमएसपीची लीगल गॅरंटी मागण्यात आली आहे.मला शेतकऱ्यांना भेटण्यापासून रोखण्यात आलं. राहुल गांधी असं म्हणत असतानाच, स्पीकर ओम बिर्ला यांनी त्यांना रोखलं आणि 'मी तुम्हाला खोट बोलू देणार नाही', असं म्हटले. 'मी मीडियाला घेऊन जेव्हा शेतकऱ्यांना भेटायला गेलो तेव्हा संसदेचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी उघडण्यात आल्याचे' राहुल गांधी म्हणाले.
इंटर्नशिप प्रोग्राम एक मस्करी
कोरोना काळात छोटे व्यवसाय संपवण्यात आले. यामुळे बेरोजगारी वाढली. अर्थमंत्र्यांनी तरुणांसाठी काय केलं? तुम्ही जाहीर केलेला इंटर्नशिप प्रोग्राम एक मस्करी आहे. भारतातील 500 कंपन्यांमध्ये ही योजना राबवली जाणार असं म्हणता. आधी तुम्ही पाय तोडलात आणि आता बॅंडेज बांधायला चाललायत, असे ते म्हणाले.
सैन्याच्या जवानांना अग्निवीरच्या चक्रव्यूहात फसवलात
परीक्षेचे पेपर फुटणे ही मोठी समस्या झाली आहे. दुसरीकडे बेरोजगारीचे चक्रव्यूह आहे.10 वर्षात 70 वेळा पेपर लीक झाले आहेत. आधी तुम्ही सैन्याच्या जवानांना अग्निवीरच्या चक्रव्यूहात फसवलात. आता या बजेटमध्ये अग्निवीरांच्या पेन्शनसाठी एक रुपयाचाही निधी दिला नाहीत. शेतकऱ्यांना तुम्ही एमएमसपीचा अधिकार देत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार 6 जण कंट्रोल करतात
ही भीती इतक्या वेगाने का पसरतेय? भाजपमधील माझे मित्र, शेतकरी, कार्यकर्ता आणि तरुण सर्वच घाबरले आहेत. हजारो वर्षांपुर्वी कुरुक्षेत्रावर अभिमन्यूला 6 लोकांनी चक्रव्युहात फसवून मारलं. चक्रव्युहाच्या आत भीती असते, हिंसा असते आणि अभिमन्यूला चक्रव्युहात फसवून 6 लोकांनी मारले. द्राणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वत्थमा आणि शकुनी यांनी अभिमन्यूला घेरलं. केंद्र सरकारदेखील नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोभाल,अंबानी आणि अदानी हे लोकं कंट्रोल करतात, असे आरोप राहुल गांधींनी केला.