Parliament Security Breach China Connection: संसदेची सुरक्षा भेदून थेट लोकसभेमध्ये खासदार बसतात त्या ठिकाणापर्यंत 2 तरुण पोहोचल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील मास्टरमाईंड ललित मोहन झा पोलिसांना शरण आल्याने सर्व आरोपी पोलिसांना सापडले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ललित झाने या कटामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मोबाईल फोन जाळून टाकल्याची माहिती दिली आहे. दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या तपासामध्ये संसदेच्या सभागृहात जे स्मोक कॅन्स वापरण्यात आले त्याबद्दलची माहिती समोर आली आहे. भारतीय खासदार बसलेल्या सभागृहात वापरण्यात आलेले स्मोक कॅन्स हे चिनी बनावटीचे होते. या स्मोक स्कॅन्सवर चिनी म्हणजेच मँडरीन भाषेत इशारा लिहिण्यात आला होता असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.


चीन कनेक्शन आलं समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांनी संसदेच्या सुरक्षेमध्ये त्रुटी निर्माण झालेल्या जो गोंधळ घडला त्या प्रकरणात एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरमध्येही स्मोक कॅनवर निर्देश आणि इशारे देण्यात आले होते याचा उल्लेख आहे. मात्र हे इशारे चिनी भाषेत होते असंही एफआयआरमध्ये म्हटलं आहे. या स्मोक कॅन्सला नंबर देण्यात आले होते. सर्वांवरच इशारा चिनी भाषेत लिहिल्याची नोंद पोलिसांनी करुन ठेवली आहे. यावरुनच या हल्ल्यात खरोखरच काही चिनी कनेक्शन आहे का हे तपासात स्पष्ट होऊ शकतं म्हणून इतक्या छोट्या छोट्या नोंदीही एफआयआरमध्ये करण्यात आल्या आहेत.


खासदारांसाठी ठरले असते धोकादायक


चिनी बनावटीच्या या स्मोक कॅनवर केवळ पर्यवेक्षणासाठी याचा वापर करावा असं लिहिलेलं आहे. म्हणजेच एखाद्या गोष्टीचं आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे स्मोक कॅन्स वापरतावेत असा याचा अर्थ होतो. मात्र हे स्मोक स्कॅन खासदारांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरले असते. हे स्मोक कॅन खासदारांसाठी धोकादायक असल्याचं यावरुनच समजतंय की या कॅन्सवर 'याचा वापर घरामध्ये किंवा बंद ठिकाणी करु नये,' असा इशारा देण्यात आला आहे. म्हणजेच हा धूर अगदी विषारी नव्हता तरी त्याचा परिणाम तेथे उपस्थित असलेल्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं या इशाऱ्यावरुन दिसून येत आहे.


मुंबईतून विकत घेण्यात आले कॅन


प्राथमिक तपासामध्ये हे स्मोक कॅन मुंबईमधून विकत घेण्यात आल्याचं समजतं. हे स्मोक कॅन कसे वापरावेत याची माहिती त्यावर लिहिण्यात आली आहे. हे स्मोक कॅन वापरताना काळजी घ्यावी असं यावर लिहिलेलं आहे. हा स्मोक कॅन वापरताना कायम चष्मा आणि हातमोजे वापरावेत असं लिहिलेलं आहे. या कॅनवरच्या वरील बाजूस असलेला भाग फिरवावा आणि त्यामधून धूर येऊ लागल्यानंतर दूर उभे रहावे असंही कॅनवर लिहिण्यात आलं आहे.


आरोपींना पोलीस कोठडी


लोकसभा आणि संसदेच्या आवारात नळकांड्या फोडल्याप्रकरणी आतापर्यंत अमोल शिंदे, नीलम आजाद, सागर शर्मा, मनोरंजन डी यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. हा संपूर्ण कट त्या ललितच्या नेतृत्वाखाली रचला गेला असून तो सुद्धा पोलिसांच्या ताब्यात असल्याने तपासाला गती मिळणार आहे. संसदेत घुसखोरी करणाऱ्या 4 आरोपींना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी या आरोपींची 15 दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी केली होती. कोर्टाने 7 दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.