चंदीगढ: हत्या आणि बलात्कारप्रकरणी तुरुंगात असलेला स्वयंघोषित धर्मगुरू राम रहीम लवकरच पॅरोलवर सुटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राम रहीम तुरुंगातून सुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रसारमाध्यमांनी हरियाणाचे कारागृह मंत्री के.ए. पनवार यांना विचारणा केली. त्यावेळी पनवार यांनी म्हटले की, दोन वर्षांच्या शिक्षेनंतर कोणताही कैदी पॅरोल मिळवण्यास पात्र ठरतो. कैद्याची तुरुंगातील वर्तणूक चांगली असेल तर पोलीस अधीक्षकांकडून स्थानिक पोलिसांना पाठवण्यात येणाऱ्या अहवालात ही बाब नमूद केली जाते. यानंतर पोलीस आयुक्तांकडून अंतिम निर्णय घेतला जातो, असे पनवार यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम रहीम सध्या रोहतक येथील सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याने डेरा सच्चा सौदाच्या कार्यक्रमासाठी ४२ दिवसांचा पॅरोल मागितला आहे. याबाबत सिरसा पोलिसांकडून प्रथम सहायक आयुक्तांना अहवाल पाठवला जाईल. ते हा अहवाल रोहतक परिमंडळाच्या आयुक्तांकडे पाठवतील. यानंतर राम रहीमच्या पॅरोलबाबत अंतिम फैसला घेतला जाईल.



सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमित राम रहिम सिंग याला २०१७ साली दोषी ठरवले होते. या निकालानंतर याणासह पंजाबमध्ये हिंसाचार झाला होता. यात सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राम रहीम पॅरोलवर बाहेर आल्यास पुन्हा अशाप्रकराची कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.