नवी दिल्ली : दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. निजामुद्दीनमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रामामुळे दिल्लीत सध्या भीतीचे वातावरण आहे. या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एकाच इमारतीतील २४ जणांना कोरोना  पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमानंतर कोरोनाचा मोठा फैलाव  होण्याचा धोका निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती होती. सध्या परिसरातील अनेकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून निजामुद्दीनमधील हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच शेकडो लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी २०० जणांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. 



दरम्यान, कोरोनाचा वाढता फैलाव होण्याचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली. कोरोनावर मात करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. 


हा धार्मिक मेळावा संपल्यानंतर यापैकी अनेकजण देशात विविध राज्यांमध्ये निघून गेले. मात्र, यासर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमधील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ही बाब समोर आली होती. यानंतर तामिळनाडू, तेलंगणा, केरळ आणि पश्चिम बंगालमधील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले होते. हे सर्वजण दिल्लीतील मेळाव्यात सहभागी झाले होते. दरम्यान, केरळमध्ये आज कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे.