महाकुंभ विशेष ट्रेनवर प्रवाशांची दगडफेक; कारण सर्वांनाच विचार करायला लावणारं, म्हणाले `आम्हाला ठार...`

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यासाठी (Mahakumbh) विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. ज्यामुळे देशभरातील भाविक येथे गर्दी करत आहेत.
मध्य प्रदेशात महाकुंभमेळ्यासाठी निघालेल्या विशेष ट्रेनवर प्रवाशांकडून दगडफेक करण्यात आली आहे. ही ट्रेन झाशी ते प्रयागराज दरम्यान प्रवास करत होती. हरपालपूर रेल्वे स्थानावर तिच्यावर प्रवाशांकडून दगडफेक झाली. झालं असं की, जेव्हा ट्रेन रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा तिचे दरवाजे आतून बंद असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. दरवाजे उघडले जात नसल्याने संतापलेल्या प्रवाशांनी ट्रेनवर तुफान दगडफेक केली. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये प्रवासी ट्रेनच्या दरवाजावर दगडफेक करुन काचा फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.
एका व्हिडीओत प्रवासी सांगताना ऐकू येत आहे की, रात्री 8 वाजता ट्रेन झाशी येथून प्रयागराजसाठी रवाना झाली होती. "ट्रेन हरपालपूर येथे पोहोचली आणि तिच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यांनी ट्रेनचं नुकसान केलं. दगड आतमध्ये फेकण्यात आले. त्यांनी प्रवाशांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये लहान मुलं आणि महिला होत्या," असं प्रवासी सांगत आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यासाठी (Mahakumbh) विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. ज्यामुळे देशभरातील भाविक येथे गर्दी करत आहेत.
रिपोर्टनुसार, अनेक प्रवासी हरपालपूर स्थानकावर ट्रेनची वाट पाहत थांबले होते. झाशी येथून दोन तासांचा हा प्रवास होता. पण ट्रेन आल्यानंतर दरवाजे बंद असल्याने त्यांना आत जाता येत नव्हतं. यामुळे संतापलेले प्रवासी हिंसा करु लागले आणि डब्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यांनी ट्रेनच्या दरवाजाच्या काचाही फोडल्या. ज्यामुळे आत असलेले प्रवासी घाबरले होते.
हरपालपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पुष्पक शर्मा म्हणाले की, पहाटे 2 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर काही लोकांनी दगडफेक केली. रेल्वेचे प्रवक्ते मनोज सिंह म्हणाले की, प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांचा जमाव प्लॅटफॉर्मवर वाट पाहत होता. ट्रेन आली आणि त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजे बंद असल्याचे आढळले. ते संतप्त झाले आणि गोंधळ उडाला. रेल्वे पोलिसांनी लवकरच घटनास्थळी पोहोचून लोकांना शांत केले आणि त्यांना प्रवासासाठी पाठवले.
"प्रयागराजला सुरळीत प्रवास करण्यासाठी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आम्ही प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करू इच्छितो. यासाठी आम्ही विशेष गाड्या चालवत आहोत," असे ते म्हणाले.