पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाईंचा खात्मा; शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या
Pathankot Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून दहशतवादी लतीफची हत्या केली आहे.
Pathankot Attack : पठाणकोट (Pathankot) येथील भारतीय हवाईदलाच्या तळावरील अतिरेक्यांनी हल्लाचा मास्टरमाईंड शाहिद लतीफचा (Shahid Latif) खात्मा करण्यात आला आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याची पाकिस्तानात (Pakistan) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळी झाडून हत्या केली आहे. दहशतवादी शाहिद लतीफ भारतातही मोस्ट वॉन्टेड होता. भारत सरकारने त्याचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता. एनआयएने (NIA) त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
2016 मध्ये जैशच्या दहशतवाद्यांनी पठाणकोटच्या हवाईतळावर हल्ला केला होता. यामध्ये सात भारतीय जवान शहीद झाले होते. शाहिद लतीफनेच या हल्ल्याची योजना आखली होती. त्यानंतर आता सियालकोटमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी शाहिद लतीफवर गोळीबार केला. या हल्ल्यात शाहिद लतीफचा मृत्यू झाला आहे. एनआयएने शाहिद लतीफविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. शाहिद लतीफ हा मूळचा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथील रहिवासी होता. तो बराच काळ जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो सियालकोट सेक्टरमध्ये जैशचा कमांडर होता. भारतात दहशतवादी घटनांची आखणी करणे आणि त्यांच्यासाठी दहशतवादी तयार करणे यासारख्या कामांची जबाबदारी त्याच्याकडे असायची.
पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 72 तासांची कारवाई सुरू होती. यामध्ये चार दहशतवादी मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांचा मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला होता. तपासाअंती शाहीद लतीफने त्या दहशतवाद्यांना शस्त्रे आणि इतर मदत केल्याचे निष्पन्न झाले. लतीफला 1996 मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकही झाली होती. तो जैशचा दहशतवादी होता. मौलाना मसूद अझहरच्या सांगण्यावरून त्याने पठाणकोटमध्ये हल्ला करण्याची योजना तयार केली होती.
पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावर 2 जानेवारी 2016 रोजी हल्ला झाला होता. भारतीय लष्कराचा गणवेश परिधान केलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. हे सर्व रावी नदीमार्गे भारत-पाकिस्तान सीमेवर आले होते. भारतीय हद्दीत पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी काही वाहनांचे अपहरण केले आणि पठाणकोट हवाईदलाच्या तळाकडे कूच केली होती. त्यांनी कॅम्पसच्या भिंतीवरून उडी मारली आणि उंच गवतातून चालत सैनिक राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले. तिथे त्यांची सैनिकांशी पहिली चकमक झाली. या गोळीबारात चार हल्लेखोर ठार झाले तर सात जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची खात्री करण्यासाठी सुरक्षा दलांना तीन दिवस लागले होते.