अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादीत (NCP) उभी फूट पडलीय आणि त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आलाय तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार (NCP MLA) आहेत. शिरूर - हवेली आणि हडपसर, अशा दोन ठिकाणचे आमदार वगळता इतर सर्वांनी अजित पवारांच्या छावणीत तंबू टाकलाय. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आमदारांमध्ये मोठी फूट पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार, बारामती, दत्ता भरणे, इंदापूर सुनील शेळके ,मावळ सुनील टिंगरे, वडगाव शेरी दिलीप मोहिते पाटील, खेड अण्णा बनसोडे, पिंपरी अतुल बेनके, जुन्नर दिलीप वळसे पाटील , आंबेगाव हे आमदार अजित पवार गटात आहेत 





तर शरद पवार (Sharad Pawar) गटात चेतन तुपे - हडपसर, अशोक पवार , शिरूर हे दोनच आमदार राहिलेत..



खासदारांचा विचार केला तर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन आणि राज्यसभेच्या एक अशा तीनही खासदारांनी शरद पवारांप्रती निष्ठा राखलीय. अर्थात तीन पैकी एक सुप्रिया सुळे, म्हणजेच शरद पवार यांच्या कन्या आहेत. तर दुसरे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, जे यु टर्न घेऊन माघारी आलेले आहेत. तिसऱ्या खासदार, राज्यसभा सभासद असलेल्या वंदना चव्हाण ह्यादेखील शरद पवारांसोबतच आहेत.


पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा विचार केला तर पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह महिला आघाडी तसेच विविध सेलच्या प्रमुखांनी शरद पवारांसोबत राहण्याची शपथ घेतलीय. महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर मात्र अजित पवारांच्या गटात सामील झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील अजित पवारांना साथ देण्याचा निर्धार केलाय.


पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिका, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषद ही जिल्ह्यातील राजकारणाची प्रमुख सत्ता केंद्र आहेत. मात्र तिन्ही ठिकाणची मुदत संपलेली असल्याकारणानं नगरसेवक असो वा जिल्हा परिषद सदस्य यांनी पक्ष फुटी संदर्भात सावध भूमिका घेतल्याचं चित्र आहे. बहुतांश कार्यकर्ते किंवा पदाधिकारी अजून कुठल्याच गटात सामील झालेले नाहीयेत. काहीजण तर दोन्ही बाजूंच्या बैठका आणि मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणावर पक्ष फुटीचा नेमका काय परिणाम होतो हे निवडणुका लागल्यावरच कळणार आहे. कोण कोणासोबत आणि कोण कोणा विरुद्ध लढणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे पक्षाचे हित राहू देत बाजूला आपलं स्वतःचं हित कशात दडलय याविषयी अनेकांच्या मनात साशंकता आहे. अशा परिस्थितीत विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी गत कार्यकर्त्यांची झाली आहे