Paytm ने पीएम-केअर्स फंडच्या माध्यमातून जमवले १०० कोटी, इतक्या कोटींचं लक्ष्य
पेटीएम कडून ग्राहकांना योगदान देण्याचं आवाहन
मुंबई : डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून (पीएम-केअर) 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे. पेटीएमने त्याच्या प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांना कोरोना व्हायरस संकटात देणगी देण्यासाठी एक व्यासपीठ दिले आहे. पेटीएमने जाहीर केले होते की पीएम-केअर फंडात 500 कोटी रुपयांचे योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे.
पेटीएमने म्हटले होते की, पेटीएमवरील प्रत्येक पेमेंटवर, यूपीआय किंवा पेटीएम बँक डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास पेटीएम 10 रुपयांपर्यंत अतिरिक्त योगदान देईल.
पेटीएमने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 10 दिवसांत पेटीएमद्वारे देण्यात आलेलं योगदान 100 कोटींच्या पुढे गेलं आहे. हा उपक्रम अजूनही जोरदारपणे सुरु आहे.
कंपनीने म्हटले आहे की, या उपक्रमात त्यांच्या 1,200 कर्मचार्यांचेही योगदान आहे. या फंडामध्ये त्याच्या कर्मचार्यांनी त्यांच्या पगारामधून हातभार लावला आहे. कंपनीने म्हटले आहे की कर्मचार्यांपैकी कोणी 15 दिवस, एक महिना, दोन महिने तर कोणी तीन महिन्यांचा पगार पंतप्रधान-केअरमध्ये दिला आहे.
पेटीएमचे उपाध्यक्ष अमित वीर यांनी म्हटलं की, या जागतिक साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी भारतीयांना आवाहन केले आहे. याशिवाय पेटीएम व केव्हीएन फाउंडेशन रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना अन्न पुरवण्यासाठी देणगी जमा करीत आहे.