सिक्कीममधल्या पॅक्याँग विमानतळाचं आज उदघाटन
सिक्कीममधला पहिला आणि देशातला १०० वा विमानतळ असणार आहे.
सिक्कीम : पर्यटन आणि सामरिक अशा दोन्ही दृष्ट्या उपयोगी असलेला सिक्कीममधल्या पॅक्याँग विमानतळाचं आज उदघाटन होणार आहे. हिमालयाच्या कुशीत तब्बल ४,५०० फूट उंचीवर बांधण्यात आलेला हा विमानतळ अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार मानला जात आहे. हा विमानतळ संपूर्णतः हरीत विमानतळ असेल. सिक्कीममधला पहिला आणि देशातला १०० वा विमानतळ असणार आहे.
पर्यटनाला चालना
गंगटोक इथे पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आत्तापर्यंत बागडोगरा या विमानतळावर अवलंबून राहावं लागत होतं. त्यानंतर साडेचार पाच तासांचा प्रवास करून गंगटोकला जावं लागत होतं. मात्र आता थेट गंगटोकजवळ हा विमानतळ उभारल्याने पर्यटनाला चालना मिळेल. तसंच भारत पाकिस्तान सीमेपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर हा विमानतळ असल्यामुळे सामरिकदृष्ट्याही त्याचं महत्त्व मोठं आहे.
थोड्याच वेळात उद्घाटन
मुख्य धावपट्टीच्या शेजारी वायुसेनेसाठी आणखी एक ७५ मीटरची दुसरी धावपट्टी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वायुसेनेची विविध प्रकारची विमानं इथे उतरू शकतील. पॅक्याँग विमानतळाचं सकाळी १० वाजता पंतप्रधान उदघाटन करणार आहेत.