Crime News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुरादाबाद (Moradabad) येथील एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ धक्कादायक आहे, याचं कारण म्हणजे यामध्ये बुरखा घातलेल्या एका तरुणीला आणि तिच्यासह असणाऱ्या तरुणीला मारहाण केली जात आहे. मेल्यानंतर तुला कबरीत जायचं नाही आहे का? अशी विचारणा यावेळी हे तरुण तिला करत आहेत. तसंच मुस्लीम तरुण मेले आहेत का? असंही विचारत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओची पोलिसांनी दखल घेतली आहे. पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 3 तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोजपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मार्केटमध्ये तरुणी कपडे खऱेदी करुन घरी चालली होती. यावेळी तिची भेट तिच्याच गावात राहणाऱ्या जयवीन याच्याशी झाली. ती त्याच्यासह बाईकवर बसून घरी चालली होती. याचवेळी मार्केटमधील दुकानदार शान-ए-आलम याने आपल्या साथादीरांसह तरुण आणि तरुणीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 


आरोपींनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच तरुणीला 'तुझ्या वडिलांना बोलाव, त्यांचा नंबर दे' असं सांगू लागले. यावेळी तरुणीने त्यांना उलट जबाब विचारला. तुम्हाला याच्याशी काय देण घेणं? असा प्रश्न तिने विचारला. त्यावर आरोपी तिला म्हणाला "तू मुस्लीम आहे, तुला कबरीत जायचं नाही का?". त्यावर तरुणी म्हणते, "जयवीन माझ्या शेजारी राहतो, तुम्हाला काय त्रास आहे?".


आरोपी यादरम्यान तरुणाला मारहाण करत असतात. त्यावेळी एक आरोपी तरुणीला म्हणतो की "मुस्लीम तरुण मेले आहेत का? याच्यासोबत का फिरत आहेस?".  यानंतर आरोपी तरुणीचा फोन खेचून घेतात. यानंतर तरुणी रडू लागते. 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


तरुणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की "भोजपूर मार्केटमध्ये खरेदी केल्यानंतर मी पायी चालत घरी निघाली होती. त्यावेळी गावातील माझ्या भावासारखा असणारा जयवीन मला भेटला. मी त्याच्यासोबत बाईकवर बसून घऱी निघाली होती. त्यावेळी मार्केमधील दुकानदार निजाकत, सलीम आणि त्यांच्या दोन साथीदारांनी आम्हाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मला आणि जयवीनला मारहाण केली. मला चुकीच्या पद्दतीने स्पर्श करण्यात आला. दुसऱ्या मुलासोबत पाहिलं तर वाईट परिणाम होतील अशी धमकी यावेळी त्यांनी दिली. कृपया याप्रकरणी योग्य कारवाई करावी". 


पोलीस महासंचालक संदीप कुमार मीना यांनी सांगितलं आहेकी, ट्विटरला एक व्हिडीओ ट्रेंड होत होता. यामध्ये तरुण-तरुणी कुठे तरी जात असताना 2 ते 3 तरुण त्यांच्याशी गैरवर्तन करत होते. पोलिसांनी व्हिडीओची दखल घेत छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतर तीन आरोपी फरार असून तपास सुरु आहे.