मुंबई : Happy New Year 2020 नव्या वर्षात्या स्वागतासाठी प्रत्येकाने आपआपल्या परिने या साऱ्याची तयारी केली होती. यामध्येच पार्टी आणि कल्ला करणाऱ्यांसोबतच भक्तिमय मार्गाने या वर्षाची सुरुवात करण्याकडेही अनेकांचाच कल पाहायला मिळाला. नव्या वर्षाच्या म्हणजेच २०२०च्या पहिल्याच दिवसाची सुरुवात वाराणासीमध्येही मोठ्या उत्साहात झाली. या खास दिवसाचं निमित्त साधत वाराणासीमध्ये गंगा नदीच्या काठावर भक्तिभावे आरती करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचारतीच्या सुरांनी आणि पवित्र अशा वातावरणाने त्यावेळी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याच गंगा आरतीदरम्यानचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओतील दृश्य पाहताना दिवासाची सुरुवात अतिशय सुरेकरित्या झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 


एकिकडे वाराणासी आणि संपूर्ण देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत होत असतानाच दुसरीकडे देशाती अनेक धार्मिक स्थळांवरही गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षांचं स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो भाविकांनी शिर्डीच्या साई मंदिरात हजेरी लावली. वेळी साईंचं मुखदर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. 



 नवीन वर्ष साईंच्या सानिध्यात घालवताना भजन-किर्तनात साईभक्त तल्लीन होताना दिसले. बाळगोपाळ, वृद्ध आणि तरूण अशा सर्वच वयोगटातील भाविकांची मांदियाळी याठिकाणी दिसून आली. विशेष म्हणजे दर्शनासाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं होतं. 



तर, इथे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही असंच वातावरण पाहायला मिळालं. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लागल्या आहेत. मंदिरात काकड आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. एकंदरच व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत प्रत्येकजण आपला विश्वास असणाऱ्या अशा एका शक्तिपुढे नतमस्तक होत वर्षाची सुरुवात शुभाशिर्वादाने करत आहे.