नवी दिल्ली : पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत गेल्या आठवडाभरापासून वाढ झालेली पाहायला मिळतेय. हाच ट्रेन्ड मंगळवारीही कायम राहिलेला पाहायला मिळालाय. भारतीय बाजारात सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झालीय. मंगळवारी पेट्रोलच्या किंमतींत २२ पैशांनी तर डीझेलवर १४ पैशांनी वाढ झालीय. सौदी अरेबियातील सौदी अरामकोच्या दोन तेल प्लान्टवर ड्रोनच्या साहाय्यानं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वात मोठा परिणाम आशियाई बाजारांवर दिसून येतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीत मंगळवारी पेट्रोल ७४.१३ रुपयांवर पोहचलंय. यासहीत पेट्रोलच्या किंमतींनी गेल्या १० महिन्याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. यापूर्वी नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्लीत पेट्रोल ७४ रुपयांच्या स्तरावर पोहचलं होतं. डिझेलच्या किंमतीत १४ पैशांची वाढ झाल्यानंतर ६७.०७ रुपये प्रती लिटर किंमतीनं विकलं जातंय.


देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर ७९.७९ रुपये प्रती लीटर आहे. तर डिझेलचा दर ७०.३७ रुपये प्रती लीटरवर दाखल झालाय.


कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर क्रमश: ७६.८२ रुपये प्रती लीटर आणि ७७.०७ रुपये प्रती लीटरवर पोहचलाय. तर डीझेलचा दर क्रमश: ६९.४९ रुपये आणि ७०.९२ रुपये प्रती लीटर आहे.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.