मुंबई : तुमचं वाहन असेल आणि तुम्ही यंदाच्या वर्षात इंधनाच्या वाढलेल्या किंमती पाहून धास्तावलेले असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे... कारण, आज तुम्हाला 'वर्षातील सर्वात स्वस्त इंधन' मिळू शकतं. याचं कारण म्हणजे आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या भावांत घसरण झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या (कच्चा माल) किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होतेय. त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या भावांवरही दिसून येतोय. सोमवारी ३.३३ डॉलर प्रती बॅरल (६.१६ टक्के) ब्रेंट क्रूड ५०.७७ डॉलर प्रती बॅरलवर घसरलंय. त्यामुळे स्थानिक बाजारात पेट्रोल ७० रुपये प्रती लीटरच्या जवळपास पोहचलंय. मंगळवारी या दरांत आणखी घसरण झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत ७ पैसे प्रती लीटरनं घसरण झालीय. यासोबतच पेट्रोल ६९.७९ रुपये प्रती लीटरवर दाखल झालं. मात्र दुसरीकडे डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल दिसून आला नाही. 


कोलकाता आणि मुंबईतही याचा परिणाम दिसून आला. यासोबतच मुंबईत ७५.४१ रुपये प्रती लीटर तर कोलकात्यात  ७१.८९ रुपये प्रती लीटरवर पेट्रोल दाखल झालं. मुंबईत डिझेलच्या किंमती ६६.७९ रुपये प्रती लीटर तर कोलकात्यात ६४.५९ रुपये प्रती लीटरवर आहेत. 


पेट्रोलच्या किंमती गेल्या वर्षभरातील सर्वात निच्चांकी ठरल्यात. यापूर्वी १ जानेवारी २०१८ रोजी पेट्रोलची किंमत दिल्लीत ६९.९७, मुंबईत ७७.८७, कोलकात्यात ७२.७२ रुपये प्रती लीटरवर होत्या. 


डिझेलच्या किंमतही गेल्या ९ महिन्यातली निच्चांकी किंमत ठरलीय. २८ मार्च २०१८ रोजी दिल्लीत डिझेल ६३.७७, मुंबई ६७.९१, चेन्नई ६७.२५ आणि कोलकात्यात ६६.४६ रुपये प्रती लीटरवर होत्या.