पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत पुन्हा घसरण, पाहा आजचे दर
५ जुलै रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्युटी आणि सेस लावण्यात आला
नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किंमतीत सुरु असलेल्या घसरणीदरम्यान पेट्रोलच्या किंमतींमध्ये सलग सहाव्या दिवशी घट पाहायला मिळाली. डिझेलही सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालेलं पाहायला मिळालं. राजधानी दिल्लीत मंगळवारी पेट्रोलमध्ये १३ पैसे प्रती लीटर घट झाली तर डिझेलच्या किंमतीत ७ पैसे प्रती लीटर घसरणीची नोंद झाली. दिल्लीत मंगळवारी सकाळी पेट्रोल ७२.८६ रुपये प्रती लीटर तर डिझेल ६६.०० रुपये प्रती लीटरला उपलब्ध आहे. मुंबईमध्ये ७९.४८ रुपये प्रती लीटर तर डिझेल ६९.१७ रुपये प्रती लीटर दर पाहायला मिळतोय.
कोलकत्यातही पेट्रोलच्या दरांत १३ पैशांनी घट झालीय. परंतु, डिझेलमध्ये मात्र केवळ ३ पैशांची घट झाली. गेल्या सहा दिवसांत पेट्रोल जवळपास ५५ पैशांनी स्वस्त झालंय. कोलकत्यात आज पेट्रोल ७५.५० रुपये तर डिझेल ६८.१९ रुपये दरानं उपलब्ध होतंय.
चेन्नईमध्ये ७५.६७ रुपये प्रती लीटर तर डिझेल ६९.७२ रुपये प्रती लीटर दरानं उपलब्ध आहे.
उल्लेखनीय म्हणजे, १ जुलै २०१९ रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत ७०.४४ रुपये तर डिझेलची किंमत ६४.२७ रुपये प्रती लीटर होती. ५ जुलै रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्युटी आणि सेस लावण्यात आला. यानंतर इंधनांच्या किंमतीत वाढ झालेली दिसून आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर WTI क्रूड ५७.१७ डॉलर प्रती बॅरल आणि ब्रेंट क्रूड ६३.९२ डॉलर बॅरलच्या स्तरावर आहे.