पेट्रोल-डिझेल एकाच दरात मिळण्याची शक्यता
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
लवकरच देशभरात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती एकसमान होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम पदार्थांचे दर एकसारखेच ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.
नैसर्गिक वायूंवर ५ टक्क्यांपर्यंत व्हॅट आकारण्यात येणार असल्याने पेट्रोल-डिझेलचे दर एकसमान होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच उद्योग जगतात वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांवरील व्हॅटचे दर कमी करण्यास राज्य सरकारांनी तयारी दर्शवली आहे. मात्र, यासंदर्भातील निर्णय जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीत घेतला जाणार आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, पेट्रोल-डिझेलच्या दरांसंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये चर्चा झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांवर सध्या जीएसटी आकारण्यात येत नाहीये.
जीएसटी लागू झाल्यास दर होणार एक-समान
जर पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू झालं तर ८० रुपयांत मिळणारं पेट्रोल अर्ध्या किंमतीत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकारला याच्या विक्रीत सर्वाधिक कर मिळतो. जर पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लागू करण्यास राज्य सरकारने सहमती दर्शवली तर पेट्रोल-डिझेलचे दर सारखेच होतील. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.