PHOTO : आयुष्यातील पहिल्या `हिरो`च्या आठवणीत प्रियंका गांधी भावूक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली
नवी दिल्ली : प्रत्येक मुलीसाठी तिच्या आयुष्यातील पहिला हिरो म्हणजे तिचे वडील असतात... आपले वडील - राजीव गांधी ह्यात नसले म्हणून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासाठीही हे गणित काही बदललेलं नाही. आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं प्रियंका गांधी वाड्रा यांनी एक अनमोल आठवण सोशल मीडियाद्वारे शेअर केलीय. वडील राजीव गांधी यांच्यासोबतचा आपल्या लहानपणीचा एक फोटो प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. 'तुम्ही माझे हिरो राहाल' असं प्रियंका यांनी राजीव यांना उद्देशून लिहिलंय. सोबतच त्यांनी हरिवंशराय बच्चन यांची 'अग्निपथ' ही कविताही जोडलीय.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी उप राष्ट्रपती हामिद अन्सारी आणि अनेक नेत्यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २८ व्या पुण्यतिथीला त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा, पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, के सी वेणुगोपाल, ए के एन्टनी, आनंद शर्मा, शीला दीक्षित आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही वीर भूमीवर राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
या निमित्तानं काँग्रेसनं सर्वच राज्यांत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय. नव्या पीढीला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या योगदानाबद्दल माहिती देण्याचा यातून प्रयत्न केला जातोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. 'माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पुण्यतिथीच्या निमित्तानं श्रद्धांजली' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीलाच मोदींनी दिवंगत राजीव गांधी यांचा उल्लेख 'भ्रष्टाचारी नंबर एक' असा केला होता. राफेल लढावू विमान व्यवहार भ्रष्टाचाराच्या आरोपांची आठवण करून देत राजीव गांधींचं नाव घेत पंतप्रधानांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता.
१९९१ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पाच दिवस अगोदर अर्थात २१ मे १९९१ रोजी एका रॅलीत तामिळनाडूच्या श्रीपेरुंबुदूरमध्ये एका आत्मघातकी बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांची हत्या घडवून आणण्यात आली होती.