coronavirus : जाणून घ्या काय आहे प्लाज्मा थेरेपी
हा इलाज अतिशय जुना आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. या व्हायरसवर अद्याप कोणतंही औषधं किंवा लस उपलब्ध नाही. भारतासह अनेक देश या व्हायरसवर लस शोदण्याचा प्रयत्नात आहेत. परंतु आता कोरोना व्हायरसवर प्लाज्मा थेरेपी फायदेशीर ठरत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्लाज्मा थेरेपीचा वापर केला जात आहे. या थेरेपीमुळे या व्हायरसवर ब्रेक लावण्यात काही प्रमाणात मदत होणार आहे. प्लाज्मा थेरेपी ऐकताना नवीन वाटतं परंतु हा इलाज अतिशय जुना आहे. या थेरेपीमुळे दिल्ली आणि कर्नाटकातील अनेक रुग्ण बरे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने दिल्ली आणि कर्नाटकमधील काही रुग्णालयांमध्ये या थेरेपीच्या इलाजासाठी मंजुरी दिली आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यात हा इलाज अतिशय फायदेशीर ठरत आहे.
काय आहे प्लाज्मा थेरेपी -
दिल्लीतील आयएलबीएस रुग्णालयातील प्रमुख डॉ. एसके सरीन यांनी सांगितलं की, प्लाज्मा थेरेपीद्वारे बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाज्मा काढून इतर रुग्णांमध्ये ट्रान्सफ्यूजन केलं जातं. या थेरेपीमध्ये एन्टीबॉडीचा वापर केला जातो, जो कोणत्याही व्हायरस किंवा बॅक्टेरियाविरुद्ध शरीरात तयार होतो. हे एन्टीबॉडी बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढून, ते इतर रुग्णाच्या शरीरात टाकले जातात. रुग्णावर एन्टीबॉडीचा परिणाम होण्यास सुरुवात झाल्यावर व्हायरस कमकुवत होऊ लागतो. त्यानंतर रुग्णाची बरं होण्याची शक्यता वाढते.
प्लाज्मा थेरेपी एका निरोगी व्यक्तीकडून, आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती स्थलांतरित करुन रुग्णाचा आजार बरा करण्यास मदत करते. या थेरेपीमध्ये कोरोना व्हायसरवर मात केलेल्या रुग्णाकडून गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी एन्टीबॉडी तत्वाचा वापर केला जातो. बरं झालेल्या रुग्णाच्या रक्तातील घटक आजारी रुग्णाच्या इम्युन सिस्टिमला बळ देतात.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR), नुकतीच कोरोना व्हायरसवर इलाजासाठी प्लाज्मा थेरेपीला मंजुरी दिली आहे. देशातील इतर अनेक राज्यांतही आता या थेरेपीचा वापर करण्याबाबत अनुमती दिली जाऊ शकते.