नवी दिल्ली: काँग्रेसच्या नवनिर्वाचित महासचिव प्रियंका गांधी यांनी सोमवारी लखनऊमधील रोड शो ने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला. या रोड शो ला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे आज दिवसभर प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळात प्रियंकांच्या रोड शोची चांगलीच चर्चा होती. मात्र, तत्पूर्वी प्रियंका यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुकवक लिहलेल्या एका पोस्टने अनेकांची लक्ष वेधून घेतले. या पोस्टमध्ये रॉबर्ट वढेरा यांनी आपण प्रियंकाला देशासाठी अर्पण करत आहोत, तिला जपा, असे भावूक उद्गार काढले आहेत. तू माझी खरी मैत्री आहेस, योग्य सहचारिणी आणि माझ्या मुलांसाठी चांगली आई असल्याचे तू सिद्ध केले आहेस. परंतु आजची राजकीय परिस्थिती दुर्भाग्यपूर्ण आहे. मला माहिती आहे की, तू तुझी जबाबदारी योग्य पद्धतीने निभावशील. मी प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो. कृपया तिला सुरक्षित ठेवा, असे वढेरा यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोमवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या प्रियंका तीन दिवसांमध्ये दररोज १२ तास वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. याशिवाय, लखनऊमध्ये त्यांची एक सभाही होणार आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी यांचा हा प्रचार काँग्रेससाठी फायदेशीर ठरण्याची आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे. आजचा रोड शो आटोपल्यानंतर प्रियंका गांधी जयपूर येथे त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. जयपूर येथे सक्तवुसली संचलनालयाकडून (ईडी) रॉबर्ट वढेरा यांची चौकशी सुरु आहे.