INS विक्रांतच्या अनावरणावरुन पंतप्रधानांवर टीका; काँग्रेसने शेअर केला 9 वर्षापूर्वीचा व्हिडीओ
विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही तर ती 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा दाखला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे
केरळच्या कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे (INS Vikrant) जलावतरण करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी नौदलाच्या नव्या चिन्हाचेही अनावरण केले. आयएनएस विक्रांतमुळे भारतीय नौदलाची ताकद आणखीन वाढणार आहे. मात्र या सोहळ्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे.
आयएनएस विक्रांतसह भारत देशांच्या निवडक गटात सामील झाला आहे जे स्वदेशी विमानवाहू जहाजे तयार करू शकतात. विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही तर ती 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा दाखला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे जहाज आयएनएस विक्रांत राष्ट्राला समर्पित करण्याचे श्रेय घेतल्याबद्दल काँग्रेसने (Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. मोदींना आधीच्या सरकारच्या योगदानाला योग्य स्थान दिले नाही असाही आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (jairam ramesh) यांनी माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांनी ऑगस्ट 2013 मध्ये आयएनएस विक्रांतचे उद्घाटन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
"मोदी सरकारचा याच्याशी काही संबंध नाही. जेव्हा युद्धनौकेचा ताफ्यात समावेश केला जात आहे, त्यावेळी मोदी सरकार सत्तेवर आहे. सत्य हे आहे की अनेक वर्षांपूर्वी एके अँटनी यांनी संरक्षण मंत्री असताना आयएनएस विक्रांत लाँच केली होती. डिझाईनपासून निर्मिती आणि लॉन्चपर्यंत राष्ट्राला समर्पित होण्यासाठी 22 वर्षे लागली आहेत. मोदी सरकारने ते नुकतेच ताफ्यात समाविष्ट केले आहे आणि त्याचे श्रेय ते घेतले आहे," असे जयराम रमेश म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच्या सरकारला याबद्दल योगदाना योग्य स्थान दिले नाही, असेही जयराम रमेश म्हणाले. अँटनी यांचा व्हिडिओ शेअर करताना जयराम रमेश म्हणाले की,"तत्कालीन संरक्षण मंत्री एके अँटनी यांनी 12 ऑगस्ट 2013 रोजी भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत लाँच केली. पंतप्रधानांनी आज त्याचा ताफ्यात समावेश केला आहे. 2014 पूर्वीही आत्मनिर्भर भारत होता. यामध्ये माजी पंतप्रधानांच्या योगदानाचेही कौतुक केले पाहिजे."
भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत देशाला समर्पित करणे हे 1999 पासून सर्व सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम आहे. पंतप्रधान मोदी हे मान्य करतील का? युद्धनौका ब्रिटनकडून मिळवण्यात काँग्रेस नेते कृष्ण मेनन यांचा मोठा वाटा होता, असेही जयराम रमेश म्हणाले.
आयएनएस विक्रांत आत्मनिर्भरतेचे उदाहरण
"आयएनएस विक्रांतचा नौदलात समावेश हा भारतीय नौदलाच्या कोची शिपयार्डमधील अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी यांना समर्पित आहे. पंतप्रधान मोदींची अडचण ही आहे की त्यांना सरकारचे सातत्य मान्य नाही कारण 2014 पूर्वी भारत नव्हता असे ते मानतात. संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाची सुरुवात कृष्ण मेनन यांनी 1957 मध्ये संरक्षण मंत्री म्हणून केली होती आणि त्या वेळी जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते," असे जयराम रमेश म्हणाले.