आम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा
`भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे`
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत आहेत. भारतावर कोरोनाचं संकट असताना, भारत कोरोनाशी सामना करत असतानाच यादरम्यान भारत शेजारील देशाकडून येणाऱ्या आव्हानांचाही सामना करत आहे. परंतु भारत मैत्री निभावतो तसं वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देत असल्याचं सांगत मोदींनी चीनला इशारा दिला आहे.
आपण भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या जवानांचा अभिमान आहे. हुतात्म्यांसमोर संपूर्ण देश कृतज्ञ असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली आहे.
2020 हे वर्ष खराब असल्याची चर्चा सुरु आहे. 2020 या वर्षात अनेक आपत्ती, संकटं आली, संकट येतच असतात परंतु या आपत्तींमुळे संपूर्ण वर्षच खराब आहे हा विचार करणं चुकीचं असल्याचं मोदींनी सांगितलं. संकटांमधूनच पुढे जायचं आहे. संकटांशी सामना करुनच आपण बळकट होऊ असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
देश लॉकडाऊनमधून बाहेर येत आहे. मात्र अनलॉकमध्ये अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सर्व नियमांचं, खबरदारीने पालन करुन, आता कोरोनाला हरवायचं आहे आणि अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे, असंही मोदींनी सांगितलं.
शेकडो वर्षांपासून वेगवेगळ्या आक्रमणकर्त्यांनी भारतावर आक्रमण केलं, लोकांचा विचार होता की भारताची रचना नष्ट होईल, परंतु या संकटांनी भारत आणखी भव्य, मजबूत झाला. भारतात एकीकडे मोठी संकटं आली, तर सर्व अडथळे दूर करत बरीच निर्मिती देखील केली गेली. नवीन साहित्य निर्माण झालं, नवीन संशोधन झालं, नवीन सिद्धांत तयार झालं, म्हणजेच संकटाच्या काळात प्रत्येक क्षेत्रात सृष्टीची प्रक्रिया चालूच राहिली, देश पुढेच जात राहिला आणि आपली संस्कृती वाढत गेल्याचं मोदींनी सांगतिलं.
या वर्षात, देश नवीन उद्दिष्टं साध्य करेल, नवीन उड्डाणं करेल, नवी उंची गाठेल, 130 कोटी भारतीयांच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे, या देशाच्या महान परंपरेवर विश्वास असल्याचंही मोदी म्हणाले.