काँग्रेससाठी सत्ता केवळ उपभोगण्याचं साधन- पंतप्रधान मोदी
निवडणुकीतला विजय आणि सत्ता संपादनाच्या पलिकडे जाऊन राजकारणाकडे पाहण्याची गरज असल्याचं मोदींनी आपल्या भाषणात नमूद केलं.
नवी दिल्ली : काँग्रेससाठी सत्ता केवळ उपभोगण्याचं साधन आहे. त्यामुळे काँग्रेस विरोधक म्हणूनही अपयशी ठरल्याची टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली. निवडणुकीतला विजय आणि सत्ता संपादनाच्या पलिकडे जाऊन राजकारणाकडे पाहण्याची गरज असल्याचं मोदींनी आपल्या भाषणात नमूद केलं.
देशात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा नसल्याचंही मोदींनी ठणकावून सांगितल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली. तर 2019 मध्ये भाजप आणखी मोठ्या बहुमतानं सत्तेत येईल असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराविषयी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. अध्यक्ष अमित शाहांच्या नेतृत्वात येत्या ३ ऑक्टोबरपासून १७ ऑक्टोबरपर्यंत केरळमध्ये भाजप पदयात्रा काढणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या १३ मुख्यमंत्र्यांसह खासदार, आमदारांनी हजेरी लावली होती.