PM Modi On Manipur Violence Viral Video: मणिपूरमध्ये 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याची घटना समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी आजपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना या घटनेमुळे मी दु:खी झालो असून माझ्या मनात प्रचंड संताप असल्याचं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यांमध्ये महिलांचं संरक्षण करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अधिक कठोर करण्याचं आवाहन केलं आहे. 


मोदी संतापले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी पावसाळी अधिवेशनामध्ये कोणती विधेयकं मांडली जाणार आहेत याबद्दलची माहिती दिली. त्यांनी अनेक विधेयकांचा उल्लेख केला. आपल्या संवादाच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील घटनेचा उल्लेख केला. "आज मी तुमच्यासमोर आलोय, या लोकशाहीच्या मंदिरासमोर उभा असताना माझं हृदय दु:खाने भरलेलं आहे. संतापाने भरलेलं आहे. मणिपूरमधील जी घटनासमोर आली आहे ती कोणत्याही सभ्य समाजासाठी ही लज्जास्पद घटना आहे," असं म्हणत पंतप्रधानांनी संताप व्यक्त केला.


राजकीय वादाच्या पुढे जाऊन...


"पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे सर्व समोर येईलच मात्र ही घटना संपूर्ण देशासाठी लज्जास्पद आहे. 140 कोटी भारतीयांना शर्मेनं मान खाली घालावी लागत आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना एक आवाहन केलं आहे. "मी सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करावी. खास करुन आपल्या मातांच्या आणि बहिणींच्या रक्षणासाठी कठोर निर्णय घ्या. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची असो या देशात कोणत्याही कोणत्या, कोणाचीही सत्ता असलेल्या राज्यात राजकीय वादाच्या पुढे जाऊन विचार करत कायदा आणि सुव्यवस्था कठोर करुन महिलांचा सन्मान जपला पाहिजे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.


कोणालाही सोडणार नाही


तसेच पंतप्रधान मोदींनी, "मी देशातील नागरिकांना विश्वास देऊ इच्छितो की, कोणालाही सोडलं जाणार नाही. देशात पूर्ण शक्तीने एकामागून एक कठोर निर्णय घेतले जातील. मणिपूरमधील मुलींबरोबर जे काही झालं आहे त्याला कधीच माफ करता येणार नाही," असंही म्हटलं आहे.


नेमकं हे प्रकरण काय?


मे महिन्यापासून हिंसाचारामुळे धुमसत असलेल्या मणिपूरमधील काही पुरुषांनी 2 महिलांना विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरुन फिरवल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांबरोबर या विषयी चर्चा करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आदिवासी संघटनेनं केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही महिलांवर शेतामध्ये काही पुरुषांनी सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर या महिलांना नग्नावस्थेत रस्त्यावरुन फिरवण्यात आलं.


कधीचा प्रकार?


सध्या समोर आलेला या व्हिडीओमधील घटना 4 मे रोजी घडली आहे. राजधानी इम्फाळपासून 35 किलोमीटरवर असलेल्या कांगपोकपाई जिल्ह्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती 'इंडेजिनिअर ट्रायबल लिडर्स फोरम'ने (आयटीएलएफ) जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळला असून ही घटना दुसऱ्या जिल्ह्यात घडल्याचं म्हटलं आहे. मात्र या प्रकरणातील एफआयआर कांगपोकपाई जिल्ह्यातच दाखल करण्यात आली आहे.