नवी दिल्‍ली : देशभरात राम मंदिराचा मुद्दा चर्चेत असताना पंतप्रधान मोदींनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशभरात राम मंदिर निर्माण करण्याची मागणी होत आहे. भाजप सरकार ज्या मुद्द्यावर सत्तेत आली तोच मुद्दा ते विसरले अशी टीका होत असताना पंतप्रधान मोदींनी त्यावर वक्तव्य केलं आहे. राजस्‍थानमध्ये अलवर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिर निर्माण करण्याच्या मार्गात काँग्रेस अडथळा आणत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'अयोध्‍या प्रकरणात काँग्रेस न्‍यायालयीन प्रक्रियेत दखल देत आहे. अयोध्‍या प्रकरणात काँग्रेसच्या वकिलांनी कोर्टात सुनावणी टाळण्याची मागणी केली आहे. काँग्रेस खूप मोठा खेळ खेळत आहे.'


मोदींनी म्हटलं की, 'सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या मोठ्या वकिलांना काँग्रेस राज्यसभेत पाठवण्याची तयारी करत आहे. भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. सुप्रीम कोर्टात वकील राम मंदिरांच्या मुद्दावर दबाव टाकतात. ते म्हणतात की, 2019 पर्यंत या प्रकरणावर सुनावणी होऊ नये. अशा प्रकारे राजकारण सुरु आहे. आज राज्यसभेचे सदस्य मोठ्या मोठ्या वकिलांच्या मार्फत सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग आणण्याची भीती दाखवतात.'


भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून देखील आता राम मंदिर बांधण्याची मागणी जोर धरत असताना भाजप सरकारवर दबाव वाढत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'जर भाजप सरकार संसदेत विधेयक आणणार असेल तर शिवसेना त्याला पाठिंबा देईल.' 


2019 ची निवडणूक जवळ येत असताना देशात पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा जोर धरु लागला आहे. अयोध्येत वातावरण तापलं आहे. येणाऱ्या काळात संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे.