नवी दिल्ली : गुरुवारी २०१९ या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण लागलं. या सूर्यग्रहणाला 'रिंग ऑफ फायर' नाव देण्यात आलं. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी सूर्यग्रहण दिसलं. सकाळी ८ वाजून २८ मिनिटांनी सुरु झालेलं सूर्यग्रहण ११ वाजून १४ मिनिटांपर्यंत होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील हे क्षण लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे टिपले. त्यांनी ट्विटरवरून सूर्यग्रहण पाहतानाचा आपला फोटो देखील शेअर केला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण त्यांनी सूर्यग्रहण पाहताणा फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना लगेचच ट्रोल केले. एका ट्विटर युजरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा फोटो मीमचा विषय झाला असल्याचं सांगितलं. यावर मोदींनी दिलेल्या उत्तरावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.



ते म्हणाले 'माझी बिनधास्त पणे थट्टा करा' असं उत्तर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलं. यंदाच्या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी मोदींनी देखील पूर्ण तयारी केली. पण ढगाळ वातावरणामुळे त्यांना सूर्यग्रहण पाहता आले नाही. याची खंत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. 



'इतर भारतीयांप्रमाणे मीदेखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. परंतु ढगाळ वातावरणामुळे मी थेट सूर्यग्रहण पाहू शकलो नाही. लाईव्ह स्ट्रीमद्वारे सूर्यग्रहण पाहिलं. त्यासोबतच तज्ञांसोबत याविषयी अधिक माहिती घेत चर्चा केली' असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. त्यांनी कोझीकोड (Kozhikode)आणि इतर शहरांत दिसलेलं सूर्यग्रहण लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे पाहिलं.