`गलवान खोऱ्यातील झटापटीबद्दल नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत`
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलून लोकांना फसवत आहेत
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. या हल्ल्यात चीनचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. मात्र, पंतप्रधान चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत कुठल्याही प्रकारे घुसखोरी किंवा भारताच्या कोणत्याही चौकीवर ताबा मिळवला नसल्याचे सांगत आहेत. परंतु, जर चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केलीच नव्हती तर हाणामारी झालीच कशी, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलून लोकांना फसवत आहेत, हे स्पष्ट होते. आता पंतप्रधान मोदींनी याबाबत लवकरात लवकर खुलासा करावा, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
'मोदींच्या वक्तव्याचा खोडकर पद्धतीने अर्थ काढला', पंतप्रधान कार्यालयाचं स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा भारताची कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात गेलेली नाही, असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले होते. तसेच भारताची एक इंच जमीनही कोणीही बळकावू शकणार नाही. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर समर्थ असल्याचे मोदींनी सांगितले होते.
'घर में घुसकर मारुंगा' म्हणणाऱ्यांची भाषा आता बदलली- कन्हैया कुमार
दरम्यान, भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने टीकेची तोफ डागत आहेत. आज सकाळीच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदींनी गलवान खोऱ्याचा प्रदेश चीनच्या ताब्यात जाऊन दिला. जर हा भूभाग चीनचाच होता तर मग आपले सैनिक कसे मारले गेले? आपले सैनिक नक्की कोणत्या जागी शहीद झाले, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.