नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आज लोकसभेतही बहुमतानं मंजूर करण्यात आलंय. गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडलं. सोमवारी राज्यसभेत १२५ विरुद्ध ६१ तर आज लोकसभेत ३७० विरुद्ध ७० अशा बहुमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. सोबतच काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आलाय. तर जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये या भूभागाला विभागण्यात आलंय. जम्मू-काश्मीरला विधानसभा असेल मात्र लडाखमध्ये विधानसभा राहणार नाही. आज लोकसभेत हे विधेयक मतांच्या मोठ्या फरकानं मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी 'खासदारांनी वैचारिक मतभेद विसरून जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या भविष्याची चर्चा केली, याचा तिथल्या नागरिकांना गर्व होईल' असं म्हटलंय. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अनुच्छेद ३७० वर करण्यात आलेली ट्विटची ही सीरिज इंग्रजी, हिंदी, उर्दु आणि पंजाबी भाषेतही केलेली दिसतेय. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ऐतिहासिक क्षण! एकता आणि अखंडतेसाठी सारा देश एकवटला! जय हिंद! संसदीय लोकशाहीसाठी हा एक गौरवाचा क्षण आहे. जम्मू-काश्मीरशी निगडीत ऐतिहासिक विधेयक मोठ्या मतांनी मंजूर करण्यात आलं' असं म्हणत नरेंद्र मोदींनी आपला आनंद व्यक्त केलाय. 


'मी जम्मू-काश्मीरच्या बंधु-भगिनींच्या साहस आणि उत्कटतेला सलाम करतो. काही स्वार्थी तत्वांनी अनेक वर्ष भावनिक ब्लॅकमेल केलं, लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न केला, विकासाकडे कानाडोळा केला. जम्मू-काश्मीर, लडाख अशा लोकांपासून स्वतंत्र झालाय. एक नवी सकाळ, एका चांगल्या भविष्यासाठी तयार आहे. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर, लडाखचे तरुण मुख्यधारेत येतील' असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

सोबतच, हा निर्णय म्हणजे सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारख्या अनेक महान नेत्यांना खरी श्रद्धांजली असेल, असंही त्यांनी म्हटलंय. 


गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जनतेसाठी चांगलं आयुष्य सुनिच्छित करण्यासाठी निरंतर कार्यरत राहतील, असं आश्वासनही मोदींनी दिलंय. सोबतच अमित शाह यांच्यामुळेच हे विधेयक मंजूर होऊ शकलंय, अशी ग्वाही देत मोदींनी शाह यांचा शुभेच्छा दिल्यात.