नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी, राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी विस्तृत चर्चा झाली असून दोन्ही देशांनी मिळून एकत्र कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. भारत आणि अमेरिका मिळून आपल्या संपूर्ण ताकदीने कोरोनाविरोधात लढा देण्याबाबत एकमत झालं असल्याचं, पंतप्रधांनानी ट्विटद्वारे सांगितलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी इस्त्राईलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्याशीदेखील कोरोनाबाबत चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांनी कोरोना व्हायरसविरोधात विविध उपाययोजनांवर चर्चा केली होती. पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांनी औषधांचा पुरवठा सुधारण्यासाठी आणि उच्च तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर या संदर्भात द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. 


अमेरिकेत कोरोनामुळे 24 तासांत 1480 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात मृत्यू होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. अमेरिकेत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 70 हजारांवर पोहचली आहे. तर अमेरिकेत मृतांची संख्या 7406 इतकी झाली आहे. 2 ते 3 एप्रिल दरम्यान एकाच दिवसांत सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  


भारतात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात आतापर्यंत 3000हून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात 75 जणांचा मृत्यू झाला आहे.