यूक्रेन संकटावर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, घेऊ शकतात मोठा निर्णय
भारताच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारत या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भारताने याआधी शांततेचं आवाहन केलं असून चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या तीव्रतेने परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. ज्याचा परिणाम आता भारतासह जगातील इतर देशांवर होऊ लागला आहे. ( pm narendra modi call high level meeting to discuss ukraine-russia crisis )
पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली
बदललेल्या परिस्थितीत भारताच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसह उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले
युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय नागरिक अडकले आहेत. यापैकी 18 हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. या नागरिकांची सुरक्षा भारतासाठी महत्त्वाची आहे. भारत रशियन आणि युक्रेन सरकारच्या समन्वयाने अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या 2 बॅचमध्ये सुमारे 600 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आले आहे.
भारताची भूमिका तटस्थ
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या या युद्धात भारताची भूमिका आतापर्यंत तटस्थ राहिली आहे. मात्र, अमेरिका आणि ब्रिटनसह पाश्चात्य देश रशियावर कारवाई करण्यासाठी भारतावर दबाव आणत आहेत. मात्र रशियासोबतचे विशेष संबंध पाहता भारताने या प्रकरणी धोरणात्मक मौन पाळले असून हे प्रकरण युद्धाऐवजी परस्पर संवादाने सोडवले जावे, असे स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे नेते वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली आहे. तणाव कमी करण्यासाठी भारताने संवादाचे आवाहन केले आहे.