पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव,तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत; `या` कार्यासाठी वापरणार पैसे
PM Narendra Modi Gifts e Auction: पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावाची पाचवी आवृत्तीही सुरू झाली आहे. यावेळी पंतप्रधानांना मिळालेल्या 900 हून अधिक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
PM Narendra Modi Gifts e Auction: जगातील प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मित्र देशांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळतात. आपल्या देशात आलेले परदेशी पाहुणे आणि परदेशातील प्रवासादरम्यान त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतात. या भेटवस्तू तुम्हाला खरेदी करण्याची संधी आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या गिफ्ट्सचा ई लिलाव केला जातो. त्यातून मिळणारा पैसा कल्याणकारी कामांसाठी वापरला जातो, असे पंतप्रधान मोदींनी आधीच सांगितले आहे. पंतप्रधान मोदींना काय मिळाली आहेत गिफ्ट? ई लिलावात त्याची किंमती किती असणार? एकत्र झालेल्या रक्कमेचे काय केले जाणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावाची पाचवी आवृत्तीही सुरू झाली आहे. यावेळी पंतप्रधानांना मिळालेल्या 900 हून अधिक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
किंमत किती?
पीएम मोदींना मिळालेल्या काही भेटवस्तू नॅशनल म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अलीकडच्या काळात मोदींना मिळालेल्या 900 हून अधिक भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचा समावेश आहे. ज्यात गुजरातमधील मोढेरा सूर्य मंदिर आणि चित्तौडगडमधील विजय स्तंभ आणि वाराणसीतील घाटाच्या चित्राचा समावेश आहे. लिलावात तुम्ही 100 ते 64 लाख रुपयांपर्यंतच्या वस्तू खरेदी करु शकता. ई-लिलाव सोमवारी सुरू झाला असून 31 ऑक्टोबरला संपेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
7,000 पेक्षा जास्त वस्तूंचा लिलाव
पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा आतापर्यंत एकूण चार वेळा ई-लिलाव झाला आहे. गेल्या चार टप्प्यांत 7,000 हून अधिक वस्तू ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये एकूण 912 भेटवस्तूंचा समावेश आहे. यामध्ये पारंपरिक अंगवस्त्र, शाल, तलवार इत्यादींचा समावेश आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी संदेशही दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची माहिती दिली. भारतभरातील अनेक कार्यक्रमांमध्ये मला दिलेल्या या भेटवस्तू भारताच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि कलात्मक वारशाचा पुरावा आहेत. अलीकडच्या काळात दिलेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह एनजीएमएमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
या कामासाठी पैसा वापरणार
पीएम मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावातून मिळणारा पैसा भारत सरकारच्या नमामि गंगे उपक्रमासाठी दिला जाणार आहे. या ई-लिलावाबाबत पंतप्रधान मोदींनी एक संदेशही शेअर केला आहे. अलीकडच्या काळात मला दिलेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांची विस्तृत श्रेणी प्रदर्शित केली जाईल, असे त्यांनी लिहिले आहे. नेहमीप्रमाणे, या वस्तूंचा लिलाव केला जाईल आणि त्यातून मिळणारी रक्कम नमामि गंगे उपक्रमाला मदत म्हणून दिली जाईल.
या वस्तू तुम्हाला तुमच्या संग्रहीदेखील ठेवता येणार आहेत. एनजीएमएच्या अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्यक्तीगतरित्या उपस्थित राहू न शकणाऱ्यांसाठी पंतप्रधानांनी वेबसाइटची लिंक देखील शेअर केली आहे.