नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व लक्ष हे केवळ स्वत:च्या प्रतिमा निर्मितीवर Image building केंद्रित आहे. सरकारच्या ताब्यात असलेल्या संस्था याच कामात जुंपल्या गेल्या आहेत. मात्र, एखाद्या माणसाची प्रतिमा हा राष्ट्रीय धोरणासाठी पर्याय असू शकत नाही, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनविषयक धोरणावर सडकून टीका केली आहे. चीनचा सामना करताना आपल्याला मानिसक कणखरपणा दाखवणे गरजेचे आहे. तुम्ही मजबूत स्थितीत असाल तरच तुम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करु शकता. तुम्हाला काय पाहिजे, ते पदरात पाडून घेऊ शकता. हे शक्य होऊ शकते. 

मात्र, तुमच्यातला कमकुवतपणा चीनच्या लक्षात आला तर सर्वकाही गडबडते. मुळात एखाद्या ठोस दूरगामी धोरणाशिवाय चीनशी वाटाघाटी करणे शक्य नाही. त्यासाठी केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दूरदृष्टीची गरज आहे. चीनचा बेल्ट रोड हा प्रकल्प पृथ्वीची भौगोलिक स्थिती बदलण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता भारताला वैश्विक दृष्टीकोनातून स्वत:ची एक अशी विचारसरणी तयार केली पाहिजे. वैश्विक विचार हाच भारताचे संरक्षणाचा उत्तम मार्ग आहे. आपल्याला सीमावाद हाताळण्याची पद्धत बदलावी लागेल. त्यासाठी आपली मानसिकत बदलायला पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 



सध्या भारत निर्णायक वळणावर आहे. आपण एका बाजूला गेलो तर जगातील निर्णायक शक्ती होऊ. दुसऱ्या बाजूला गेलो तर जगाच्यादृष्टीने आपल्याला फारसा अर्थ उरणार नाही. सध्या मला एकच चिंता वाटत आहे की, आपण एक मोठी संधी गमावत आहोत. कारण आपल्याकडे दूरदृष्टी नाही. आपण व्यापक स्तरावर विचार करत नाही. आपण एकमेकांशी लढूनच देशांतर्गत स्थैर्य गमावत आहोत. देशातील राजकारणाकडे पाहिल्यावर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. आपण सतत एकमेकांशी लढत आहोत. दूरदृष्टीच्या अभावामुळे हे सर्व घडत आहे. 

पंतप्रधान मोदी हे माझे विरोधक आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणे, एखाद्या कामासाठी त्यांच्यावर अंकुश ठेवणे हे माझे काम आहे. तर दूरदृष्टी दाखवणे हे पंतप्रधानांचे काम आहे. मात्र, पंतप्रधानांकडे अशी दूरदृष्टीच नाही. त्यामुळे आज चीनला भारतात घुसखोरी करणे शक्य झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.