पंतप्रधान मोदी हेच आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय- संजय राऊत
राम मंदीरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.
नवी दिल्ली : एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर अयोध्येत राम मंदीराच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विजयी खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना टोला लगावला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय असल्याचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राम मंदीरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 16 जूनला आपल्या खासदारांना घेऊन अयोध्येत रामललाचे दर्शन घेतील. मंदीर निर्माणाची योग्य वेळ आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या नेतृत्वात अयोध्येत राम मंदीराचे निर्माण होणार असल्याचे राऊत म्हणाले. ही काही श्रेय घेण्याची लढाई नाही. देशाने मोदींना निवडले आहे. आम्ही त्यांचे ऐकू. आता तेच आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहेत.
संजय राऊत यांनी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांची भेट घेतली.
या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे ट्वीट त्यांनी केले. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना आहे. त्यामुळे डेप्युटी स्पीकर पदाची मागणी नाही तर ते मिळणे नैसर्गिक असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळाला. हे प्रभु रामाच्या आशीर्वादाने शक्य झाले. याचे ऋण फेडण्यासाठी उद्धव ठाकरे रामललाच्या दर्शनाला जात असल्याचे ते म्हणाले.