पंतप्रधान मोदींमुळे मी पोस्टर बॉय झालोय- विजय मल्ल्या
या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी माझे नाव घेतले होते.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यामुळे भारतात माझी पोस्टर बॉयसारखी प्रतिमानिर्मिती झाल्याचे वक्तव्य मद्यसम्राट विजय मल्ल्या याने केले. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी मोदी यांनी मल्ल्याकडून त्याच्या कर्जापेक्षा बँकांनी अधिक वसूली केल्याचे म्हटले होते. याविषयी मल्ल्याने ट्विटरवरून नाराजी व्यक्ती केली. त्याने म्हटले आहे की, भारत सरकारसाठी मी एक पोस्टर बॉय झालो आहे. मी १९९२ पासूनच ब्रिटनचा नागरिक आहे. मग भाजपचे नेते मी भारतातून पळून गेलो, असे का सांगत फिरतायेत, हा सवाल मल्ल्याने उपस्थित केला.
यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीचाही दाखला दिला. या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी माझे नाव घेतले होते. मी बँकांकडून ९ हजार कोटींचे कर्ज घेतले. परंतु बँकांनी माझी १४ हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. मग तरीही भाजपचे नेते माझ्याविरोधात भाषणबाजी का करतात?, असेही मल्ल्याने विचारले.
गेल्या काही दिवसांपासून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रत्यार्पण प्रक्रियेबाबतही मोदींनी समाधान व्यक्त केले होते. आमच्या सरकारने असा कायदा तयार केला आहे की, त्यामुळे फरार झालेल्या गुन्हेगारांची जगाच्या पाठीवर कुठेही असलेली संपत्ती जप्त होऊ शकते. विजय मल्ल्याकडून त्याच्या कर्जाच्या दुप्पट वसुली करण्यात आली असल्याचेही मोदींनी सांगितले होते.