नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करताना कसलाही विचार केला नव्हता. हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नव्हती. लॉकडाऊनमुळे देशभरातील मजूर आणि स्थलांतरित कामगारांचे काय होईल, ही शक्यताच मोदींनी विचारात घेतली नव्हती, अशी टीका एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच तेलंगणावरून छत्तीसगढला जात असताना एका १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तिने १०० किलोमीटरचा प्रवास पायी केला होता. देशभरात स्थलांतरित कामगारांची हीच परिस्थिती आहे. अनेकजण लॉकडाऊनमुळे आपल्याला स्वत:च्या घरी पोहोचता येणार नाही, या भीतीने आत्महत्या करत असल्याचे ओवेसी यांनी सांगितले. 


पंतप्रधान मोदींनी लॉन्च केली स्वामित्व योजना, ग्रामपंचायत प्रमुखांशी साधला संवाद

या स्थलांतरित कामगारांपैकी अनेकांची बँक खाती नाहीत, त्यांच्याकडे रेशनकार्डही नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या आधारकार्डाचा क्रमांक ग्राह्य धरून त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ओवेसी यांनी केली. 
तसेच सरकारी गोदामांमध्ये पडून असलेल्या तांदळपासून सॅनिटायझर तयार करण्याऐवजी तो गरिबांना वाटण्यात यावा. तसेच केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या प्रकल्पांचा निधी गरजू लोकांची मदत करण्यासाठी वळवण्यात यावा, असा प्रस्तावही ओवेसी यांनी मांडला.


यावेळी ओवेसी यांनी पालघर हत्याकांडाबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, भाजप नेत्यांनी या घटनेमागे मुस्लिमांचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर मला मोठा धक्का बसला होता. अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भाजप नेत्यांकडून याबाबत वक्तव्य करण्यात आले होते. मात्र, थोड्याच दिवसात या सगळ्यात मुस्लिमांचा कोणताही हात नसल्याचे स्पष्ट झाले, याकडे ओवेसींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.