नरेंद्र मोदी हॉवित्झर तोफेवर स्वार होतात तेव्हा...
याठिकाणी के ९ वज्रसोबतच भविष्यातल्या अत्याधुनिक तोफांची निर्मिती केली जाणार आहे.
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी के ९ वज्र या भारतीय लष्करातल्या अत्याधुनिक हॉवित्झर तोफेवरून फेरफटका मारला. लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या चिलखती तंत्रज्ञान विभागाचे गुजरातमध्ये पंतप्रधानांनी उदघाटन केले. खासगी उद्योगाने सुरू केलेल्या देशातल्या अशाप्रकारच्या पहिल्या विभागात के ९ वज्र या तोफेची निर्मिती केली जाणार आहे. के ९ वज्र या १५५ मिलीमीटर कॅलिबर तोफेच्या निर्मितीचे ४,५०० कोटींचे कंत्राट एलअँडटीला २०१७ मध्ये मिळाले. त्यानुसार १०० तोफांची निर्मिती इथे केली जाणार आहे. सूरतपासून ३० किलोमीटर अंतरावर हाजिरा इथे एलअँडटीने हा कारखाना उभारला आहे. याठिकाणी के ९ वज्रसोबतच भविष्यातल्या अत्याधुनिक तोफांची निर्मिती केली जाणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत या तोफेची निर्मिती करण्यात आली आहे. या तोफेच्या समावेशामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे. दरम्यान, हॉवित्झर तोफेवरील नरेंद्र मोदी यांचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. हा व्हीडिओ मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. या व्हीडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.