नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं खास कौतुक केलं. राज्यसभेतील भाषणात त्यांनी राष्ट्रवादी आणि बिजू जनता दलावर स्तुतीसुमनं उधळली. या दोन्ही पक्षाचे खासदार कधीही गोंधळ घालण्यासाठी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत आले नाहीत. या दोन्ही पक्षांकडून इतरांनी शिकण्याची गरज आहे, असं मोदी म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेच्या २५० व्या अधिवेशनात सहभागी होणं ही भाग्याची गोष्ट आहे, असं सांगतानाच देशाची धोरणं ठरवण्यात राज्यसभेचं मोठं योगदान आहे, असं विधान मोदींनी केलं.


एकीकडे नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं असतानाच शिवसेना खासदार शेतकरी प्रश्नावरुन आक्रमक झाले. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर केंद्र सरकारला धारेवर धरले. ओला दुष्काळप्रकरणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ आणि घोषणाबाजी दिसून आली. शिवसेना खासदारांनी लोकसभा कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.


शिवसेना खासदारांनी लोकसभेत देखील वेलमध्ये उतरून गोंधळ घालत घोषणाबाजी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ओला दुष्काळासंदर्भात नंतर ऐकून घेणार अशी प्रतिक्रिया दिली मात्र तरी देखील शिवसेनेची घोषणाबाजी सुरूच होती.