वकिली आणि संसद या दोन्हींमध्ये जेठमलानींचे अमूल्य योगदान- पंतप्रधान
ज्येष्ठ वकील जेठमलानी यांना ज्येष्ठ नेत्यांची आदरांजली
नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन झालंय. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते ९५ वर्षांचे होते. राम जेठमलानी यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२३ रोजी पाकिस्तानातील शिकारपूरमध्ये झाला त्यांनी एस.सी. शहानी लॉ कॉलेजमधून वयाच्या १७व्या वर्षी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अनेक खटल्यांचं कामकाज पाहिलं. जेठमलानी यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू,पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच जेष्ठ नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जेठमलानी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत जेठमलानी कुटुंबीयांचं सांत्वन केले.
जेठमलानी यांच्या जाण्यामुळे भारताने अनन्य साधारण असा वकील गमावल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
वकिली आणि संसद या दोन्हींमध्ये अमूल्य योगदान देणारे हे व्यक्तिमत्व होते. तसेच ते स्वभावाने धाडसी व विनोदी होते.कोणत्याही विषयावर बेधडकपणे मत मांडायचे अशी आठवणही त्यांनी सांगितली. आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी न डगमगता लढा दिला. त्यांच्याशी अनेकदा बोलण्याची संधी मिळाली हे मी माझ भाग्य असल्याचेही पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.