राहुल गांधींच्या मिठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
या अविश्वास ठरावातून विरोधकांचा अहंकार दिसला अशी टीका मोदींनी केलीय.
नवी दिल्ली : एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा सरकारवरील अविश्वास ठराव आणि यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मारलेली मिठी यावरही आपलं मत व्यक्त केलंय. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नव्हता आणि संख्याबळही नव्हतं अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधलाय. या अविश्वास ठरावातून विरोधकांचा अहंकार दिसला अशी टीका मोदींनी केलीय. यावेळी राहुल गांधी यांनी मिठी का मारली यावरही मोदींनी आपलं मत मांडलंय. नामदारांचे स्वतःचे नियम असतात अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर टीका केलीय.
'मोठ्या मताधिक्याने जिंकू'
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २०१४ च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. एका इंग्रजी दैनिकाला आणि एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी पुढील सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केलाय.
उद्योगांना संरक्षण
प्रामाणिकपणे उद्योगधंदे चालवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचे आश्वासनही मोदींनी दिलंय.. सध्या आसाममध्ये पेटलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केलंय. विरोधकांच्या महाआघाडीवरही मोदींनी हल्लाबोल केलाय. हताश झालेल्या परस्परविरोधी पक्षांच्या समूह म्हणजे राजकीय उतावळेपणा असल्याची टीका मोदींनी केलीय.