बेगुसराय : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. जे तुमच्या मनात आहे, तेच माझ्याही मनात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. बिहार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण केलं. त्यावेळी मोदींनी पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही उपस्थिती होती. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी यवतमाळमध्ये होते. तेव्हा त्यांनी दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी जवानांना सरकारकडून खुली सूट​ आल्याचे सांगितले.


शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.  दहशतवाद्यांनी लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना शिक्षा मिळणारच. आम्हाला आमच्या सैनिकांवर गर्व आणि विश्वास आहे. सुरक्षा विभागाला खुली सूट देण्यात आल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. पाकिस्तान हे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. धीर धरा, आपल्या जवानांवर विश्वास ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले. पुलवामाच्या दहशतवाद्यांना शिक्षा कधी द्यायची ? कशी द्यायची ? हे सर्व आपले जवान योग्य वेळी ठरवतील असेही ते म्हणाले.