नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान पंतप्रधान मोदींची घेतलेली गळाभेट ही तशी ऐतिहासिकच. यावरून  सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. पण, भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भलतेच वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी यांनी गळाभेट घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ची मेडिकल टेस्ट करायला हवी असे म्हटले आहे. स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केले आहे. या ट्विटमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.


बुद्धूला गळाभेट घेऊ द्यायला नको होती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांची बुद्धू अशी संभावना करत सुब्रह्मण्यम स्वामी म्हणतात, नरेंद्र मोदी यांनी बुद्धूला गळाभेट घेऊ द्यायला नको होती. रशिया आणि कोरियामध्ये विषारी सुई टोचण्यासाठी अशी पद्धत अवलंबली जाते. मला वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवी. त्यांनी तपासून पाहिले पाहिजे की, सुनंदा पुष्कर यांच्याप्रमाणे त्यांच्या शरीरालाही एखादी मायक्रोचिपतर नाही ना लावली.



 दस्तुरखूद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही गोंधळून गेले


संसदेत अविश्वास ठरावादरम्यान, राहुल गांधी यांनी तडाखेबंद भाषण ठोकले. त्यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. ही घटना घडत असताना क्षणभर सभागृहही अवाक् झाले. पण, दस्तुरखूद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही गोंधळून गेले. मोदींच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बरेच काही सांगून गेले. या गळाभेटीची चर्चा सध्या प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियात जोरदार सुरू आहे.