नवी दिल्ली : भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध पातळ्यांवर सर्वांशी चर्चा करत आहेत. खेळाडू, सेलिब्रिटी, विरोधी पक्षनेते अशा सर्वांशी त्यांनी कोरोनाच्या आव्हानाबाबत चर्चा केली. देशवासियांचे मनोबल वाढण्यासाठी, एकजुट दाखविण्यासाठी थाळ्या वाजवणे, दिवे लावण्याचे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले. त्यांच्या या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता पंतप्रधानांचे नुकतेच एक ट्विट आले आपल्याला वादात ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच मिनिटं उभे राहून पंतप्रधान मोदी यांचा गौरव करुया अशी मोहीम सुरु असल्याचे पंतप्रधानांच्या निदर्शनास आले. देशभरात अशा प्रकारचा एक संदेश फिरत असल्याची बातमी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली. यामुळे पंतप्रधान नाराज झाले. हे माझ्या सदीच्छांसाठी कदाचित सुरु असेल. पण मला सन्मानित करायचे असेल तर किमान कोरोना जाईपर्यंत एखाद्या गरीब परिवाराची जबाबदारी घ्या. यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी असू शकत नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 



५ मिनिटं उभे राहून पंतप्रधानांना सन्मानित करुया अशी मोहीम चालवली जात आहे. प्रथमदर्शनी हे मला वादात खेचण्याची कुरापत दिसत असल्याचा संशय मोदींनी ट्विट करुन व्यक्त केलाय. 



त्यामुळे मोदींच्या सन्मानार्थ मोहीम राबवू इच्छिणाऱ्या समर्थकांची चांगलीच कोंडी झाली आहे.