मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे 2.23 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. बहुतांश मालमत्ता बँक ठेवींच्या स्वरूपात आहेत. पंतप्रधानांकडे आता कोणतीही स्थावर मालमत्ता नाही, कारण त्यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये असलेली आपली जमीन दान केली आहे. या जमिनीची किंमत 1.1 कोटी रुपये होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) वेबसाइटवर पंतप्रधानांच्या संपत्तीची घोषणा केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, 31 मार्च 2022 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती 2 कोटी 23 लाख 82 हजार 504 रुपये होती. त्याचवेळी मोदींच्या जंगम मालमत्तेत गेल्या वर्षीच्या तुलनेत 23.16 लाख रुपयांची वाढ झाली आहे.


पंतप्रधानांनी कोणत्याही बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली नाही, त्यांच्याकडे स्वत:चे वाहनही नाही. मोदींकडे 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्याची किंमत 1.73 लाख रुपये आहे. 31 मार्च 2021 पर्यंत पंतप्रधानांकडे 1.1 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती.


मोदींनी दान केलेल्या जमिनीचा भाग गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2002 मध्ये खरेदी केला होता. या जमिनीवर आणखी 3 जणांचे मालकी हक्क होते. यामध्ये पंतप्रधानांचा चौथा (25%) हिस्सा होता, जो त्यांनी दान केला.


पीएमओच्या म्हणण्यानुसार, पोस्ट ऑफिसमध्ये पंतप्रधान मोदींच्या नावावर सुमारे 9 लाख रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे जमा आहेत. 31 मार्च 2022 पर्यंत पंतप्रधानांकडे एकूण 35,250 रुपये रोख होती. त्याचवेळी पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या नावावर 9 लाख 5 हजार 105 रुपये किमतीचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र जमा आहे. मोदींचा 1 लाख 89 हजार 305 रुपयांचा आयुर्विमाही आहे.


गेल्या आर्थिक वर्षात सर्व 29 कॅबिनेट मंत्र्यांनी स्वतःची आणि त्यांच्या अवलंबितांची संपत्ती जाहीर केली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे 2.54 कोटी रुपयांची जंगम आणि 2.97 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, आरके सिंग, हरदीप सिंग पुरी, पुरुषोत्तम रुपाला आणि जी किशन रेड्डी यांचाही यावेळी मालमत्ता जाहीर करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.


मुख्तार अब्बास नकवी यांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे. नकवी यांनी जुलैमध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सध्या केंद्रात 28 कॅबिनेट मंत्री आहेत.