अयोध्या : अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक संपली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीमध्ये शिलान्यासाच्या तारखेबरोबरच मंदिराची उंची आणि मंदिर बांधकामाच्या व्यवस्थांवरही चर्चा झाली. राम मंदिर उभारण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भूमिपूजनानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरूवात होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार ३ ऑगस्ट किंवा ५ ऑगस्ट भूमिपूजनाची संभाव्य तारीख असू शकते. पण याबाबत पंतप्रधान कार्यालय अंतिम निर्णय घेईल. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याचीही शक्यता आहे. असं झालं तर २०१४ साली पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच अयोध्येत जातील.


मंदिराच्या मॉडेलमध्ये बदल


श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक संपल्यानंतर महासचिव चंपत राय यांनी माध्यमांशी संवाद साधला. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या तारखेसाठी पर्याय ठेवले आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालय शेवटचा निर्णय घेईल, असं चंपत राय म्हणाले. तसंच प्रस्तावित राम मंदिर मॉडेल १२८ फूट उंच आहे, पण ही उंची आता १६१ फूट उंच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्भगृहाजवळ ५ घुमट बनवण्यात येतील, असंही चंपत राय म्हणाले.


मंदिर निर्माणासाठी मातीची ताकद किती आहे, याचे रिपोर्ट येणं बाकी आहे. यानंतर पाया किती ठेवायचा, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ६० मीटर खालून मातीचे सॅम्पल घेतले जातील. या कामासाठी एल ऍण्ड टी कंपनीची निवड केली असल्याचं चंपत राय यांनी सांगितलं. 


मंदिर उभारणीला किती वेळ?


राम मंदिराचं बांधकाम ज्या दिवशीपासून सुरू होईल, तेव्हापासून मंदिर पूर्ण व्हायला जवळपास साडेतीन वर्षाचा कालावधी लागेल. तसंच मंदिर उभारणी करताना वर्गणीही गोळा केली जाईल, अशी माहिती मिळत आहे. 


राम मंदिराचं मॉडेल तयार 


प्रस्तावित राम मंदिराचं मॉडेल तयार झालं आहे. प्रसिद्ध आर्किटेक्ट सीबी सोनपुरा यांनी मंदिराचं मॉडेल तयार केलं आहे. गुजरातमध्ये राहणाऱ्या सीबी सोनपुरा यांच्या पुर्वजांनी सोमनाथ मंदिराचंही मॉडेल तयार केलं होतं. अयोध्येमध्येही सोनपुरा कुटुंब कार्यशाळेत आजही काम करत आहे. या मॉडेलमध्ये राम मंदिर दोन मजली दाखवण्यात आलं आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीमध्ये राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या रुपरेखेवर चर्चा झाली. भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच प्रमुख पाहुण्यांच्या यादीबाबतही चर्चा करण्यात आली. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यात येईल, असं सांगण्यात येतंय.


भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय टीम, देशातले प्रमुख साधू संत आणि अयोध्या आंदोलनाशी जोडले गेलेल्यांनाही आमंत्रण दिलं जाईल. याशिवाय अयोध्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनाही विशेष आमंत्रण दिलं जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. 


अयोध्येत गर्भगृहात राम मंदिर निर्माणाच्या कामासोबतच ६७ एकर क्षेत्रात राम मंदिर परिसराचंही काम सुरू करण्यात येणार आहे.