अनुच्छेद ३७० नंतर पीओके आमचा पुढचा अजेंडा- जितेंद्र सिंह
पीओके मोदी सरकारचा पुढचा अजेंडा...
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. या दरम्यान त्यांनी जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणं हे सर्वात मोठं यश असल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय पीओकेला भारताचा अभिन्न भाग बनवणं हा आमचा पुढचा अजेंडा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. जितेंद्र सिंह यांनी पाक व्याप्त काश्मीरबाबत बोलताना म्हटलं की, ही फक्त माझी किंवा माझ्या पक्षाची इच्छा नाही तर १९९४ मध्ये पी वी नरसिंह राव यांच्या नेतृत्वात असलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारची देखील हीच इच्छा होती.'
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या टीका आणि कुरापती यावर देखील त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, 'जगातील देश भारताच्या निर्णयाशी अनुकुल आहेत. काही देश जे भारताच्या या निर्णयाच्या विरोधात होते ते आता भारताच्या बाजुने आहेत. काश्मीरमधील जनता देखील खूश आहे. काश्मीरमध्ये हळूहळू परिस्थिती सामान्य होत आहे'
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की, 'काश्मीरमध्ये लोकांवर बंदी नाही आणि कर्फ्यू देखील नाही. फक्त काही गोष्टींवर बंदी आहे. देशविरोधी घोषणा देणाऱ्य़ांनी आपली मानसिकता आता बदलली पाहिजे. दहशतवाद्यांकडून सामान्यांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात आहे.'