कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येनंतर (Kolkata Rape and Murder) संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जात असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पण अद्यापही देशभरात मुली, महिला सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आग्रा (Agra) शहरात नुकतीच अशी घटना घडली आहे. येथे काही हुल्लडबाज तरुणांनी स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत अश्लील इशारे करत होते. दोन बाईकवर असणारे हे तरुण कित्येक किलोमीटरपर्यंत तिचा पाठलाग करत होते. यादरम्यान त्यांच्यातील एकाने स्कुटीला पाय मारुन तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला. अखेर एका ट्राफिक कॉन्स्टेबलच्या मदतीने तरुणीची सुटका करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी रात्री यमुनेच्या किनारी रस्त्यावरुन निघालेल्या एका तरुणीला भयानक अनुभव आला. बुलेट आणि अजून एका बाईकवर असणाऱ्या तरुणांनी कित्येक किमीपर्यंत एका तरुणीचा पाठलाग केला. ताजगंजपासून ते बेलनगंजपर्यंत ते तिचा पाठलाग करत छेड काढत होते. यादरम्यान अश्लील शेरेबाजी करत तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न झाला. 



त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने तरुणीची सुटका करण्यात आली. यादरम्यान पोलिसांना चकमा देऊन सर्व हुल्लडबाज तरुण पळून गेले. नंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आरोपी आरोपी युसूफ आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या स्कुटमधील पेट्रोल संपले तेव्हा तिचा भाऊ आणि मित्र तिला पेट्रोल पंपावर नेण्यासाठी पायांनी स्कुटी ढकलत होते, मात्र वाटेत काही दुचाकीस्वार तरुणांनी तरुणीची छेड काढली आणि अश्लील हावभाव केले. तिच्या सहकाऱ्यांनी विरोध केला असता शिवीगाळ करण्यात आली.


रविवारी रात्री आग्रामध्ये जोरदार पाऊस झाला. तरुणी पावसात भिजत बेलगंज येथील आपल्या घरी जात होती. वाहतूक पोलीस राजीव कुमार यांनी सांगितले की, यमुनेच्या काठावरील हाथी घाटावर त्यांनी पाहिले की, दोन बुलेट चालवणारे तरुण आणि दुसऱ्या दुचाकीवर तीन तरुण मुलीचा पाठलाग करत आहेत. त्यांनी मुलीच्या स्कूटरला मध्यभागी घेरून तिचा विनयभंग केला. त्यांनी दुचाकीस्वारांना थांबवल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.


याप्रकरणी अँटी रोमिओ पथकाने छठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी युसूफ आणि फिरोजला अटक केली आहे. बुलेटवर स्वार असलेल्या अन्य तिघांचा शोध सुरू आहे.