उत्तर प्रदेशात दोन लहान मुलांच्या हत्येमुळे खळबळ माजली असून, अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुलांच्या वडिलांसह असणाऱ्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी साजिदला एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या तिसऱ्या मुलाने घटना घडली तेव्हा साजिद आणि जावेद असे दोन आरोपी उपस्थित होते अशी माहिती दिली आहे. तसंच साजिदने आधी मोठ्या भावाकडून चहा आणि छोट्याकडून पाणी मागवलं होतं असंही सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी साजिद याचं पीडितांच्या घऱासमोर केशकर्तनालय आहे. तो मुलांचे वडील विनोद यांना ओळखत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी संध्याकाळी साजित त्यांच्या घऱी गेला होता. त्याला 5 हजार रुपये उधार हवे होते. पण विनोद घरी नव्हते. विनोद यांची पत्नी चहा बनवण्यासाठी गेली असता साजिदने त्यांच्या तिन्ही मुलांवर हल्ला केला.


हत्येची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली. यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपा साजिदचं केशकर्तनालय जाळून टाकलं. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, साजिदने विनोदची पत्नी संगिताला आपली पत्नी गरोदर असून रुग्णालयात असल्याचं सांगत 5 हजारांची मागणी केली होती. यानंतर संगिताने विनोदला फोन केला असता त्याने पैसे देण्यास सांगितलं होतं. 


संगीता किचनमध्ये चहा बनवत असताना, साजिदने 11 वर्षीय मोठा मुलगा आयुशला आईचं ब्यूटी सलून दाखवण्यास सांगितलं. आयुष त्याला वरती घेऊन जात होता. दुसऱ्या माळ्यावर पोहोचताच साजिदने लाईट बंद केली आणि आयुषवर चाकूने हल्ला केला. 


साजिद आयुषचा गळा कापत असतानाच 6 वर्षीय अहान तिथे पोहोचला. साजिदने अहानला पकडलं आणि त्याच पद्धतीने हल्ला केला. यानंतर त्याने तिसऱ्या मुलाकडे मोर्चा वळवला. पण 7 वर्षांचा पियूष पळून जाण्यात आणि लपण्यात यशस्वी झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


यानंतर साजिदने आपला भाऊ जावेदसह घटनास्थळावरुन पळ काढला. जावेद घराबाहेर बाईकवर त्याची वाट पाहत थांबलेला होता. घटनेत साजिद आणि जावेद दोघेही सहभागी असल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.


पोलिसांकडून साजिदचा एन्काऊंटर


पोलिसांनी आरोपी साजिदचा एन्काऊंटर केला आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, साजिदला पकडण्यात आलं असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत तो ठार झाला. पोलीस निरीक्षकाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जावेद मात्र अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पण हत्येचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पोलिसांनी विनोदसह असलेल्या वादातून साजिदने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. विनोदने मात्र हा दावा फेटाळला असून आपल्यात काही वाद नव्हता असं सांगितलं आहे. "माझा साजिदसह कोणताही वाद नव्हता. मी कामानिमित्त घऱाबाहेर असताना तो आला होता. त्याने 5 हजार रुपये मागितले असता पत्नीने दिले होते. माझा एक मुलगा हल्ल्यातून वाचला असून, त्याने आईला अलर्ट केलं." अशी माहिती त्याने दिली आहे.