गुवाहाटी : कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण भारत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर या विषाणूपासून देशाला मुक्ती मिळावी म्हणून राज्य आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. शिवाय जनतेला  घरात सुरक्षित राहण्याचे सतत आवाहन करत आहेत. पण काही नागरिक सरकारच्या या आदेशाचं पालन न करता मोकाट रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे रस्त्यावर फिरणारे बेजबाबदार नागरिक आणि सततच्या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस दिवस रात्र एक करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशात शनिवारी सकाळी आसाममध्ये गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना हवेत गोळीबार करण्यात आला. परंतू पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. असं एका पोलिस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जनतेनं  फक्त आवश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन सतत करण्यात येत आहे. तरी देखील नागरिक सध्याच्या परिस्थितीला गांभिर्याने घेताना दिसत नाहीत.


भावलागिरी बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती आणि लोक सामाजिक अंतर नियमाचं पालन करत नव्हते.  जेव्हा पोलिस नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगत होते, तेव्हा जमलेल्या काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार करण्यास सुरूवात केली. शिवाय ४ लोकांना अटक देखील केली आहे. 


चीनमध्ये उदयास आलेला हा विषाणू दिवसागणिक संपूर्ण जगासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. आजच्या आकड्यानुसार संपूर्ण जगात ६ लाख १७ हजार ७०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २८ हजार ३८१ रुग्णांचा या धोकादायक विषाणूमुळे बळी गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे १ लाख ३७ हजार ३३६ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे.