गुंडगिरी करत शहरात आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न कऱणारे छोटे मोठे गुंड प्रत्येत शहरात थोड्या फार प्रमाणात दिसत असतात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या गुंडांवर जर वेळीच वचक ठेवला नाही, तर भविष्यात ते मोठे गुन्हे करण्याची भीती असते. त्यामुळेच वेळीच या गुंडांचा माज उतरवणं गरजेचं असतं. मध्य प्रदेशातील इंदोर येथे अशाच प्रकारे नागरिकांना चाकूने भोसकत दहशत पसरवण्याचा प्रयत्न कऱणाऱ्या गुंडाना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी आरोपींची धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदोर पोलिसांनी 2 सप्टेंबरला शहरातील तिघांना भोसकल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली. यानंतर पोलिसांनी त्यांना धडा शिकवण्यासाठी शहरात जाहीर धिंड काढली. यावेळी त्यांना उठाबशाही काढण्यास लावलं. इतकंच नाही तर आरोपींची शहरात धिंड काढली जात असताना 'मै हू खलनायक' गाणं लावलं होतं. यानंतर आरोपींनाही आपण किती मोठी चूक केली आहे याची जाणीव झाली होती. कारण ते वारंवार पोलिसांची माफी मागत होते. तसंच भविष्यात असे गुन्हे करणार नाही असं आश्वासनही देताना दिसत आहेत. 


शहरातील 74 सेक्टरमध्ये आरोपींनी हे कृत्य केलं होतं. अमन वर्मा, राहुल गुर्जर आणि राहुल मराठा हे तीन तरुण आपला वाढदिवस साजरा करत होते. यावेळी अमित सोनी आणि प्रितम खुशवाह या आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. 



आरोपी अमित आणि प्रितम हे जबरदस्ती परिसरात घुसले होते. यानंतर त्यांचा आणि पीडित तरुणांचा वाद झाला होता. या वादात आरोपींनी तिघांवर चाकूने हल्ला करत त्यांनी भोसकलं होतं. 


यानंतर तिन्ही मित्रांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आरोपींची गुंडगिरी उतरवण्यासाठी पोलिसांनी त्यांची जाहीर धिंड काढली.